News Flash

पालिकेच्या पटावर विधानसभेची खेळी

केंद्रात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधीच राज्यातील विधानसभेच्या तयारीचे बिगुल वाजले असून महापालिकेच्या पटावर शिवसेना-भाजपाच्या खासदार, इच्छुक आमदारांनी खेळी करण्यास सुरुवातही केली आहे.

| May 24, 2014 02:26 am

केंद्रात नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधीच राज्यातील विधानसभेच्या तयारीचे बिगुल वाजले असून महापालिकेच्या पटावर शिवसेना-भाजपाच्या खासदार, इच्छुक आमदारांनी खेळी करण्यास सुरुवातही केली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी नवनिर्वाचित खासदार व विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीत आयुक्तांसोबत बैठक घेऊन मुंबईच्या विकास व सौंदर्य आराखडय़ावर चर्चा केली तर भाजपाच्या नव्या खासदारांनी शहराच्या पायाभूत सुविधा, वाहतूक समस्या, मिठी नदी या विषयांवर आपली पकड मजबूत केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी संध्याकाळी महापौरांच्या बंगल्यावर पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे, नाल्यांची स्वच्छता, पावसाळ्यातील साथींच्या आजारांना अटकाव, पाणी साचून होणारी वाहतूक कोंडी, अशा विषयांवर आयुक्त सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा केली. मुंबईच्या विकास आराखडा कामाला गती, व्हच्र्युअल क्लासरुम प्रकल्पाचा विकास, वाय-फाय यासोबतच या चर्चेत मुंबईच्या सौंदर्यीकरणावरही विशेष भर देण्यात आला. बागांचा विकास, पवई तलावात लेझर शो, पक्षी उद्यान, हुतात्मा पार्क, भायखळा उद्यानात पेंग्विन पार्क हे आधीच जाहीर करण्यात आलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासंबंधी विचारविनिमय झाला. या चर्चेला महापौरांसह नवनिर्वाचित खासदार राहुल शेवाळे आणि पालिका सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव उपस्थित होत्या.
भाजपाचे गटनेते मनोज कोटक आणि नवोदित खासदार पूनम महाजन यांनी शुक्रवारी सकाळी मिठी नदीचा पाहणी दौरा केला. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये राबवलेल्या साबरमती रिव्हर फ्रंटप्रमाणे मिठी नदीच्या किनाऱ्यावरही मनोरंजक सुविधा उपलब्ध करून शहराचे सौंदर्य वाढवण्याचा विचार भाजपा नेते करत आहेत. त्यासाठी अतिक्रमण हटवण्याचा व नदीत सोडले जाणारे सांडपाणी इतर ठिकाणी वळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी व किरीट सोमय्या महापौर सुनील प्रभू यांना भेटायला आले. शहरातील पायाभूत सुविधा, बॉटल नेकमुळे होणारी वाहतूक समस्या तसेच कॅम्पाकोलासारख्या विषयावर यावेळी चर्चा झाली. विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर असल्याने त्याआधी मतदारांना कामे करून दाखवण्याचा सपाटा लावणे आवश्यक असल्याने पालिकेच्या मदतीने नवनिर्वाचित खासदार व सेना-भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवारांनी तयारी  करण्यास सुरूवात केली आहे.

मुद्दय़ासाठी धडपड
नागरिकांसाठी सर्वच कामे करण्याचे ठरवले असले तरी हाती घेतलेल्या विषयावरून आपली ओळख ठरते हे लक्षात घेऊन भाजपाचा प्रत्येक खासदार मुद्दय़ाच्या शोधात आहे. किरीट सोमय्या यांनी रेल्वेचा विषय हाती घेतला असून नवोदित पूनम महाजन यांनी मिठी नदीला आपलेसे केले आहे. नरेंद्र मोदी यांना नियमितपणे रिपोर्ट कार्ड दाखवावे लागणार असल्याने भाजप नेत्यांना आणखी नवीन मुद्दय़ांना हात घालावा लागणार आहे, मात्र त्यात मुंबईकरांचाच फायदा आहे, असे भाजपामधील एका नेत्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 2:26 am

Web Title: shiv sena bjp mp start work focusing mh assembly election
Next Stories
1 ‘पेडन्यूज’प्रकरणी अशोक चव्हाण यांना आठवड्याभराचा दिलासा
2 ड्रोन वितरणाला नियमांची प्रतीक्षा
3 शिवसेना उपशहरप्रमुख मोहन राऊत प्राणघातक हल्ल्यात ठार; सर्व पक्षांचा ‘बदलापूर बंद’
Just Now!
X