हिंदुत्व सोडले नसल्याची उद्धव यांची स्पष्टोक्ती; राज यांचाही भगवा झेंडा

‘ना आमचा रंग बदलला, ना अंतरंग बदलले. शिवसेनेचा रंग भगवा होता आणि भगवाच आहे’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि भगवा सोडला नसल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. दुसरीकडे, मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिनी आणि मातांनो’ अशी भाषणाची सुरुवात करत आपल्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. त्याआधी त्यांनी पक्षाच्या भगव्या झेंडय़ाचे अनावरण केले.

मुंबई : शिवसेनेने वचनपूर्ती सोहळयात भगवा आणि हिंदुत्व कायम असल्याचा संदेश देतानाच भाजपला लक्ष्य केले. जुन्या मित्रपक्षाने दिलेले वचन मोडले आणि शिवसेनेलाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मधल्या काळात केवळ विरोधकांनी नव्हे, घरातल्यांनीही वार केले, असा टोला उद्धव यांनी राज यांना लगावला.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेले वचन पूर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलात शिवसेनेचा वचनपूर्ती सोहळा झाला. यावेळी ११ ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि भगवा हाती घेतल्याने उद्धव ठाकरे काय बोलतात, याबाबत उत्सुकता होती. उद्धव ठाकरे यांनी भगवा कायम असल्याचे स्पष्ट करतानाच भाजपवर टीका केली. ‘‘मला खोटे ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी केवळ उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी घाबरणारा नाही तर लढणारा आहे. मी जर गप्प बसलो असतो तर तुम्हा सर्वाना काय तोंड दाखवले असते? त्यामुळे चाळीस वर्षे ज्यांच्या विरोधात लढलो त्यांना सोबत घेऊन वेगळा मार्ग निवडला. शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात आणली. असे असले  शिवसेनेचा रंग भगवाच होता व भगवाच आहे.’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हा माझा नव्हे, तर शिवसैनिकांचा सत्कार आहे. शिवसेनेसाठी घाम गाळणारे, लढणारे प्रसंगी रक्त सांडणारे सर्व शिवसैनिक आज आठवत आहेत. माझे मुख्यमंत्रिपद राज्यातील तमाम शिवसैनिकांना समर्पित आहे. तुम्ही माझे सुरक्षाकवच आहात. यापुढच्या लढाईत मला साथ द्या. तुम्ही आमच्या कुटुंबावर विश्वास दाखवला आहे. कधीही विश्वासघात होणार नाही. आम्ही तुमचे कायमचे ऋणी राहू, असे भावूक उद्गार उद्धव यांनी काढले.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मराठी व हिंदी मनोरंजन जगतातील नामांकित कलाकारांनी कला सादर केली. तसेच सर्व ज्येष्ठ शिवसेना नेते व मंत्रिमंडळातील मंत्री या सर्वाचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला.