मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषेला अशोभनीय म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांची ‘साम-दाम-दंड-भेद’ची भाषा मुख्यमंत्र्यांनी अजून आत्मसात के लेली नाही. त्यामुळेच ठाकरे यांची सुसंस्कृत आणि अरे ला कारे करण्याची रोखठोक पण संस्कारात्मक भाषा फडणवीसांच्या लेखी अशोभनीय ठरली असावी. पण भाजपवाले मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उद्धार करतात ती भाषा शोभनीय असते का, अशा शब्दांत शिवसेनेने शनिवारी भाजपला प्रत्युत्तर दिले.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नव्हते अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल के ल्यानंतर शिवसेनेनेही लगेच ‘तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ अशी विचारणा फडणवीस यांना के ली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत सांगितले की, फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेला अशोभनीय म्हटल्याचे आश्चर्य वाटते.

भाजपची फौज कधी महिला, तर कधी पत्रकारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका नव्हे तर उद्धार करतात. मग मुख्यमंत्र्यांनी फक्त प्रांजळ घणाघात केला तर त्यांचे म्हणणे इतके विरोधकांच्या जिव्हारी का लागले, असा टोमणाही त्यांनी लगावला.