परिवार संवाद यात्रा काढत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षबांधणीची मोहीम सुरू केली असताना शिवसेनेचा संघटनात्मक विस्तार करून पक्ष गावागावात पोहोचवण्यासाठी २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या काळात राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पोहोचत आहेत, पण पैसै मागण्यासाठी, असा चिमटा भाजपला काढत आपल्याला तसे करायचे नाही. राज्यातील तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यभरातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हा प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत शिवसंपर्क अभियानाचा निर्णय जाहीर करण्यात आला. २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या काळात शिवसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

बाबरी मशीदच्या प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती. आता भाजप रस्त्यावर आली आहे ती पैसे मागण्यासाठी, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ‘राम का नाम बदनाम ना करो’ असा टोलाही त्यांनी लगावला. गृहमंत्री अमित शाह यांना नेपाळ आणि श्रीलंकेसारख्या शेजारी देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करायचा आहे, असे वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केल्यावरून हिंमत असेल तर पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.