राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे भांडण ही नित्याचीच बाब असून प्रत्येक जण संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर वार करीतच असतात. मात्र आमच्या भांडणात भाजपने पडण्याची गरजच नव्हती. वाली आणि सुग्रीव यांच्या भांडणात एकमेकांना गदा लागली तरी चालले असते. परंतु या भांडणात रामाने बाण मारण्याची गरज नसतानाही त्याने तो का मारला, असा सवाल करीत विधान परिषदेचे मावळते सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सोमवारी भाजपच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उमटविण्याचा प्रयत्न केला.
देशमुख यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेत मांडलेला अविश्वास प्रस्ताव भाजपच्या पाठिंब्यामुळे ४५ विरुद्ध २२ अशा मतांनी संमत झाला आणि देशमुख यांना सभापतिपदावरून पायउतार व्हावे लागले. या ठरावावरील चर्चेच्या वेळी बोलताना देशमुख यांनी शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांची तोंड भरून स्तुती केली,
तर सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडताना आमच्या भांडणात त्यांनी पडायला नको होते अशी अपेक्षाही व्यक्त केली. सभापतिपदाच्या कार्यकाळात आपल्याविषयी अविश्वास वाटावा असे कोणतेही कृत्य सभागृहात वा बाहेर घडलेले नाही. सभागृहात मांडण्यात आलेल्या प्रस्तावातही तसा कोणताही उल्लेख नाही. अविश्वास वाटावा असा एकही आरोप सिद्ध झाल्यास हे सभागृह देईल ती शिक्षा भोगू असे प्रारंभीच स्पष्ट करून देशमुख यांनी आपल्यावरील आक्षेप फेटाळून लावले. आकडय़ांची सोंगटी फेकून सत्त्वशील राजकारणाच्या परंपरेला काळिमा फासत अप्रतिष्ठेचे गणित जुळविण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या खेळाचा खेद वाटतो अशा शब्दांत त्यांनी या दोन्ही पक्षांवर टीका केली.
राजकारणाचे गुण आपल्यात कमी असल्यामुळेच त्याचे आपल्याला अनेकदा फटके बसले, काही वेळा मानसिक त्रासही झाला. तरीही पक्षाने आपल्याला सर्व काही दिले. आपण कधीही पाठ दाखविली नसून संकटाला सामोरे जाणे हे आपल्या रक्तातच आहे. अविश्वास ठराव ही तत्त्वाची लढाई असून त्यातून माघार घेणार नाही असे सांगत, स्वत:हून राजीनामा देऊन पदावरून पायउतार होण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव देशमुख यांनी फेटाळून लावला. अखेर मतदान झाले आणि विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी बाकांवरील भाजपप्रमाणे, विरोधी बाकांवरील काँग्रेस आणि सत्ताधारी बाकांवरील शिवसेना अशा ऐक्यातून विधान परिषदेच्या इतिहासात एक नवी नोंद झाली.

राष्ट्रवादी-भाजप ‘युती’ अधोरेखित ; अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात संगनमत झाल्याची शंका व्यक्त केली जात होती. अविश्वास ठरावावर भाजपने राष्ट्रवादीला मदत होईल अशी भूमिका घेतल्याने भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पडद्याआडून युती झाल्याचे स्पष्ट झाले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीला पर्याय देण्यात आला होता, पण राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही. कारण भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये समझोता झाला होता याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

सरकारच्या विरोधात आक्रमकच राहणार – अजितदादा
सभापतींच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यासाठी भाजपने आम्हाला मदत केली ती केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी आहे. याचा अर्थ आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार हा काँग्रेसचा प्रचार साफ खोटा असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. या ठरावानिमित्त एकत्र मतदान केले याचा अर्थ राष्ट्रवादी भाजप सरकारच्या विरोधात गप्प बसेल असे नाही. सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका कायम राहील, अशी पुष्टी अजितदादांनी जोडली.

पृथ्वीराजबाबा आणि ठाकरेंविरोधात उट्टे काढले !
मुंबई : शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास मंजूर करून पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांच्या विरोधातील रागाचे उट्टे राष्ट्रवादीने काढले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने या दोन नेत्यांनाच सोमवारी लक्ष्य करण्यात आले होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचा संताप जगजाहीर आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची निवड करावी, असे पत्र राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दिले होते. पण ही निवड करण्यास देशमुख यांनी टाळाटाळ केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले तरच विधान परिषदेत राष्ट्रवादीला हे पद द्यावे अशी खेळी काँग्रेसने केली होती. त्यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पुढाकार होता.
काँग्रेसमध्येही या साऱ्या घोळास पक्षांतर्गत व्यवस्थापनाचा अभाव कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांची विरोधी पक्षनेतेपदी वेळीच निवड तत्कालीन सभापती देशमुख यांनी केली असती तर अविश्वास ठराव राष्ट्रवादीला मांडण्यास संधी मिळाली नसती, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह
आहे.