News Flash

आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर काँग्रेसवर फोडणे हा पंतप्रधान मोदींचा पांचटपणा-शिवसेना

देशाच्या चलनाचे मूल्य घसरते तेव्हा देशाची पतही त्याच वेगाने घसरत असते हा दावा भाजपाचे नेते करत मग आता देशाची पत वाढली का? असेही शिवसेनेने विचारले

आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर काँग्रेसवर फोडणे हा पंतप्रधान मोदींचा पांचटपणा-शिवसेना

डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण सुरूच आहे. रिझर्व्ह बँक हतबल असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असे म्हणत अपप्रचार करत आहेत. तुमचे हे नवे अर्थशास्त्र सामान्यांच्या कल्पनेपलिकडचे आहे. आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर कधी काँग्रेसवर तर कधी रघुराम राजन यांच्यावर फोडणे हा पांचटपणा आहे असे म्हणत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान केले आहे. सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवसेनेने टीका केली आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात?
डॉलरच्या तुलनेत रूपया आता शवागृहात पोहचला आहे. शस्त्रक्रियेची वेळ निघून गेल्याने क्रियाकर्मच करावे लागते की काय अशी भीती आम्हाला वाटते आहे. रिझर्व्ह बँक हतबल आणि हताश आहे. डॉलरच्या तुलनेत रूपया अतिचिंताजनक स्थितीत पोहचला आहे. सोमवारी तो इतका घसरला की नीचांकाचासुद्धा विक्रम झाला. सोमवारी जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या अर्थव्यवस्थेला काँग्रेसने सुरुंग कसा लावला हे यावर भाषण देत होते. गेल्या चार वर्षांपासून ते स्वतः सत्तेवर आहेत याचा त्यांना विसर पडला का?

देशाच्या चलनाचे मूल्य घसरते तेव्हा देशाची पतही त्याच वेगाने घसरत असते हा दावा भाजप नेते काँग्रेस राजवटीत करीत असत. मग आज रुपया पडझडीत शंभरीच्या गाळात जात असताना देशाची पत वाढली आहे असे समजायचे काय? रुपया मृत्युपंथाला लागला असताना हिंदुस्थानची अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकाची ‘मजबूत’ झाली आहे असा दावा करणे हास्यास्पद आहे. रुपयाची पडझड रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली? कोणती पावले उचलली? तर तेथेही बोंबच आहे. हिंदुस्थानची अर्थव्यवस्था रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यामुळे घसरली असा मृदुंग वाजवून नीती आयोगाने सरकारची चमचेगिरीच केली.

बुडीत कर्जासंदर्भात राजन यांनी घेतलेले निर्णय अर्थव्यवस्थेस मारक ठरले असे नीती आयोगाचे आता म्हणणे आहे, पण रघुराम गेले तेव्हा रुपयाचे मूल्य जे होते त्यापेक्षा ते आता जास्त वेगाने घसरले. नोटाबंदीसारख्या फालतू गोष्टींना व सरकार स्वतःवरच करीत असलेल्या हजारो कोटींच्या जाहिरातबाजींना रघुराम यांनी विरोध केला होता. ही सरळसरळ देशाच्या तिजोरीची लूट असल्याचे त्यांचे मत होते, पण खोटारडेपणा, भंपकपणा व जाहिरातबाजीस चटावलेल्या आमच्या राज्यकर्त्यांनी रघुराम यांना घालवून दिले.

आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर कधी काँग्रेसवर फोडायचे तर कधी रघुराम राजनवर फोडायचे हा पांचटपणा झाला. तुम्ही काय केले ते सांगा! पण सरकारकडे सांगण्यासारखे काही नाही. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ते तीन मूर्तीवरील नेहरूंचे स्मारक हटवणार आहेत. निवडणुका ई.व्ही.एम. पद्धतीनेच घेणार आहेत. राहुल गांधी हे नालायक आहेत व ते मांसाहार करून मानसरोवर यात्रेस गेल्याने धर्म भ्रष्ट झाल्याचा आरोप भाजपने केला; तोही फक्त घसरलेल्या रुपयाची किंमत वाढवण्यासाठीच! रुपया का घसरला, अर्थव्यवस्था का बुडाली, या मागची हीच कारणे असतील तर देशही बुडत आहे हे मान्य करायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2018 5:30 am

Web Title: shivsena criticized pm narendra modi on economic issue in india saamna editorial
Next Stories
1 ‘मुली पळवण्याचा प्रकार घडला तर पहिला गुन्हा राम कदमांवर दाखल करा’
2 १४ जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार करण्याचे आदेश
3 रुग्णांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी राज्यस्तरीय समिती
Just Now!
X