काँग्रेससारख्या पक्षांना सध्या शवासनाची गरज आहे. काँग्रेस आणि विरोधकांकडे पाच वर्षांचा भरपूर वेळ आहे त्यामुळे त्यांनी पुढची पाच वर्षे ‘कपालभाती’ योग करत रहावा. कपालभातीचा प्रयोग केल्याने विरोधकांमध्ये उर्जा निर्माण होईल का? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखातून योग दिवसाचा संदर्भ घेऊन शिवसेनेने विरोधकांवर टीकेचे बाण चालवले आहेत.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘योग’ दिवस साजरा केला. त्यांच्यामुळे भारतीय योग जगात पोहचला ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. मात्र योग अनेक असले तरीही राज’योग’ सगळ्यात महत्त्वाचा आणि खरा. हा राजयोग मोदींना मिळाला. त्यामुळे योग आणि सत्ता यांचा संबंध आहे हे मान्य करावे लागेल. असे म्हणतानाच शिवसेनेने राहुल गांधीवर ही निशाणा साधला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे गुरूवारी संसदेच्या सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असताना ‘मोबाईल योग’ करताना दिसले. हेदेखील राजयोग नसण्याचाच परिणाम असावा. काँग्रेस पक्षाने खुलासा दिला आहे की मोबाईलमध्ये ते राष्ट्रपतींच्या भाषणातील काही न समजलेल्या हिंदी शब्दांचा अर्थ शोधत होते. आता खरे काय ते या पक्षालाच माहित. मात्र राजयोग नसल्यानेच राहुल गांधी यांना असा द्राविडी प्राणायम करावा लागला हेच खरे असेही शिवसेनेने म्हटले आहे.

दरम्यान याच अग्रलेखातून शिवसेनेने ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली आहे. योगसाधनेचे धडे कुणीतरी ममतादीदींना द्यायला हवेत. त्यांचे रक्त उसळते आहे व ते त्यांच्या आरोग्यास हानीकारक आहे. त्यांनीही योग केला तर त्यांच्या राज्यातले प्रश्न निवळतील असा खोचक टोलाही शिवसेनेने लगावला आहे. योग धर्म, जात, पंथांच्या वर आहे असेही मोदी म्हणतात. त्यांची भावना शुद्ध आहे. तरीही संसदेत ‘जय श्रीराम’ विरुद्ध ‘अल्लाहो अकबर’चे नारे लागतात. संसदेची एका क्षणात धर्मसंसद होते असं म्हणत शिवसेने ओवेसी यांच्यावरही टीका केली आहे. तसंच अनेकदा संसदेच्या सभागृहातले सदस्य ‘डुलकी योग’ किंवा ‘आरामासन’ करताना दिसतात तेही राजयोग नशिबी नसल्यामुळेच असंही शिवसेनेने म्हटलं आहे. योग दिवस साजरा कसा झाला याचे यथार्थ वर्णन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळत शिवसेनेने विरोधकांवर टीकेचे बाण चालवले आहेत.