नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे सुरूवातीला समर्थन करणाऱ्या आणि नंतर सोयीस्करपणे भूमिका बदलणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शिवसेनेने टीकेचे आसूड ओढले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून शरद पवारांच्या या दुटप्पी भूमिकेचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय आर्थिक आणीबाणी वाटत असल्याचे पवारांचे विधान दुतोंडीपणाचे म्हणावे लागेल. मोदी बारामतीत त्यांच्या मांडीस मांडी लावून बसले होते. त्या व्यासपीठावरून पवारसाहेबांनी हे शब्दबाण सोडले असते तर आम्हीही त्यांना ‘जाणते राजे’ मानायला मागेपुढे पाहिले नसते, पण बारामतीत चमचेगिरी करायची आणि मुंबईत बोटे मोडायची हे धंदे लोकहिताचे नाहीत, अशी जहरी टीका सेनेने केली आहे.

बारामती येथील कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे शरद पवार यांनी मला काही गोष्टी बोट धरून शिकविल्याची कबुली दिली होती. मोदी यांच्या याच विधानाचा धागा पकडत शिवसेनेने पवारांना लक्ष्य केले आहे. ‘देशाचा प्रमुखच जर हा देश गुन्हेगारांचा असल्याचे भासवत असेल तर हा देश कष्टकर्‍यांचा, मजुरांचा आहे हे सिद्ध करावे लागेल,’ असे श्री. पवार यांचे म्हणणे आहे. पण बारामतीतील त्यांचे वागणे नेमके विरुद्ध होते व सर्व राजकीय कौशल्य आपण पवारांकडूनच शिकल्याची कबुली पंतप्रधान मोदी यांनी बारामतीत दिली आहे. त्यामुळे कष्टकर्‍यांच्या-शेतकर्‍यांच्या आजच्या वाताहतीस सरकारचे राजगुरू श्री. शरद पवार हे तितकेच जबाबदार आहेत, असे अग्रलेखात म्हटले आहे. मोठ्या लोकांच्या चुकांसाठी सामान्यांना फासावर लटकवायचे प्रकार देशाला परवडणारे नाहीत व हे सर्व घडत असताना पुढारीपण मिरवणारे तोंड दाबून बसले असतील तर ते घातक आहे, असे खडे बोलही शिवसेनेकडून पवार यांनी सुनाविण्यात आले आहेत.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील जवळीक नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून जनमानसात पसरलेली नाराजी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल संशय निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निश्चलनीकरण आणि बुलेट ट्रेनवरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका करीत पक्ष भाजपच्या मागे वाहात जात नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.