शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. आदित्य ठाकरे यांना आज सर्वजण शुभेच्छा देत आहे. आदित्य ठाकरे राजकीय नेते असले तरी बॉलिवूडशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. अक्षय कुमार, दिनू मौर्या यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांना त्यांनी उपस्थित लावली आहे. यामुळेच बॉलिवूड सेलिब्रेटीही आज आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देत आहेत. तरुणांचे नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्याबद्दल तरुणाईलाही अनेक प्रश्न आहेत. असाच एक प्रश्न म्हणजे आदित्य ठाकरे कधी आणि कोणासोबत लग्न करणार ? एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी अप्रत्यक्षपणे अभिनेत्री दिशा पटानीचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांना यासंबंधी प्रश्न विचारला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनीही तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तरही दिलं होतं.

अहमदनगरमधील आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरे यांना लग्नाचा प्रश्न विचारत पाय खेचण्याचा प्रयत्न केला होता. रश्मी वहिनींनी किती वर्ष जबाबदारी घ्यायची ? असं विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून माझी जबाबदारी आईंने मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे असं उत्तर दिलं होतं. यावर अवधून गुप्ते यांनी पण आम्हाला बातम्यांमध्ये काहीतरी दिसत असतं…आपका उत्तर हमको पटनी चाहिये ? म्हणत अप्रत्यक्षपणे दिशा पटानीचा उल्लेख केला होता.

आणखी वाचा- जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक, आदित्य ठाकरेंना कळताच बाळाच्या वडिलांकडे एक लाख रुपये सोपवत सांगितलं की…

यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकली आहे असं मिश्कील उत्तर दिलं होतं. “आईने आधीच जबाबदारी सोडली आहे. आई मला नेहमी राजकारणात जाऊ नको असं सांगायची. तुझे वडील, आजोबा राजकारणात आहेत. जसं पेपरमध्ये चांगलंही लिहिलं जातं तसं वाईटही. तिने मला आमदार होण्याआधी विचारलं का ? मी लढू शकतो असं विचारलं का ? असंही विचारलं होतं. त्यामुळे पुढचं काही ठरलं नसून आई सगळं ठरवणार आहे”, असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं. यावर धीरज देशमुख यांनी आपण ते एलिजेबल आणि अॅव्हेलेबल असल्याचं सांगत आहेत असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

संगमनेर येथे आयोजित मेधा महोत्सवात तरुण आमदारांशी संवाद साधण्यात आला होता. जानेवारीत हा कार्यक्रम पार पडला होता. दिग्दर्शक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या या मुलाखतीत धीरज देशमुख, आदिती तटकरे, आदित्य ठाकरे, रोहीत पवार, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील हे सर्व तरुण आमदार सहभागी झाले होते. यावेळी सर्व आमदारांनी दिलखुलास चर्चा करत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली होती.