शिवस्मारकाच्या उभारणीला होणारा विलंब आणि शिवरायांच्या पुतळयाच्या उंचीवरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. ‘पटेलांचा पुतळा हा जगात ‘लय भारी’ ठरावा म्हणून मुंबईच्या समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटली’’ असा नवा आरोप राष्ट्रवादीचे प्रांतीय अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला व तो खरा ठरावा अशा घटना घडत आहेत. पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण आहे व त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘युनिटी’चे दर्शन झाले पाहिजे असे अग्रलेखात म्हटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. शिवरायांचा पुतळा हा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा भारी व जास्त उंचीचाच व्हायला हवा व त्यासाठी फक्त फडणवीस सरकारने नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी एकत्र यायला हवे असे अग्रलेखात म्हटले आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात
– जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांचा व्हावा अशी मोदींची इच्छा असेलही. हा पुतळा आज अंतराळातून दिसतो त्याचे कौतुक आहे, पण हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय हेच हिंदूंचा आत्मा व प्राण आहेत. ते सदैव राष्ट्राच्या अंतरंगात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या उंचीचा नेताही नाही व शिवरायांपेक्षा मोठ्या उंचीचा पुतळाही होणार नाही हे श्रीमान फडणवीस, तुम्हीही ठणकावून सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!

– गुजरातमधील सरदार पटेल यांचा पुतळा म्हणजेच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अंतराळातूनही दिसतो त्यामुळे मोदीभक्त खूश आहेत. सरदार पटेल यांच्या कार्याची उंची भक्तांपेक्षा मोठी आहे. पटेलांचा पुतळा अंतराळातून दिसतो म्हणून पटेल मोठे नाहीत, पटेलांसारखे मोठे कार्य करून दाखवणे हीच पटेलांची उंची मोजण्याची ‘मोजपट्टी’ ठरली असती. पटेलांचा पुतळा 182 मीटरचा आहे व तो जगातील सगळ्यात उंच पुतळा ठरला. ‘‘पटेलांचा पुतळा हा जगात ‘लय भारी’ ठरावा म्हणून मुंबईच्या समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटली’’ असा नवा आरोप राष्ट्रवादीचे प्रांतीय अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला व तो खरा ठरावा अशा घटना घडत आहेत. सरदार पटेलांचा पुतळा गुजरात सरकारने बांधला व त्याचे लोकार्पण झाले. सरकारी तिजोरीची दारे त्यासाठी सताड उघडी ठेवली, पण महाराष्ट्रात शिवरायांच्या भव्य स्मारकाची अद्याप पायाभरणी झाली नाही याची खंत कुणाला वाटते काय? सरदारांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा आधी व्हावा व त्यांच्या समोर शिवरायांसारखे युगपुरुषही खुजे ठरावेत अशी एखादी अंतस्थ योजना होती काय व त्यानुसारच शिवरायांच्या भव्य स्मारकाचा खोळंबा झाला काय अशी शंका घेण्यास वाव आहे.

– शिवरायांचा पुतळा हा इतर कोणत्याही नेत्यापेक्षा भारी व जास्त उंचीचाच व्हायला हवा व त्यासाठी फक्त फडणवीस सरकारने नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी एकत्र यायला हवे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यासाठी त्यावेळी सत्ताधारी, विरोधकांची एकजूट झाली व त्यातूनच भव्य असे हुतात्मा स्मारक उभे राहिले. शिवरायांच्या भव्य स्मारकासाठी अशी एकजूट व्हावी. सध्या शिवरायांच्या पुतळ्याच्या श्रेयासाठी अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे. शिवस्मारकासाठी सरकारने महामंडळ स्थापन केले. त्याचे अध्यक्ष विनायक मेटे, पण स्मारकासंबंधीचे सर्व निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेत आहेत. शिवरायांचे भव्य, उंच स्मारक ही भाजप, मेटे व इतर संघटनांची मक्तेदारी नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे, केंद्राचेही ते कर्तव्य आहे. शिवराय, पृथ्वीराज चौहान, गुरू गोविंदसिंग यांच्या तलवारी चालल्या म्हणून हिंदुस्थानचे संपूर्ण पाकिस्तान होणे थांबले. शिवरायांची भवानी तलवार ही सगळय़ांचीच प्रेरणा होती. आजही आहे.

– हिंदुत्वाला प्रतिष्ठा देण्याचे काम सर्वात प्रथम छत्रपती शिवरायांनी केले. त्यांनी मोगलांना गाडून जे राज्य निर्माण केले त्याचे नाव ‘हिंदवी स्वराज्य’ ठेवले. शिवराय नसते तर देशाचीच सुन्ता झाली असती. त्यामुळे अरबी समुद्रात छत्रपतींचा भव्य पुतळा उभारण्याचे राजकारण थांबवायला हवे. जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेलांचा व्हावा अशी मोदींची इच्छा असेलही. हा पुतळा आज अंतराळातून दिसतो त्याचे कौतुक आहे, पण हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवराय हेच हिंदूंचा आत्मा व प्राण आहेत. ते सदैव राष्ट्राच्या अंतरंगात आहेत. म्हणूनच पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण आहे व त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘युनिटी’चे दर्शन झाले पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे.

– फडणवीस यांनी अशी घोषणा केली म्हणून मोदी, शहा त्यांच्यावर डोळे वटारणार नाहीत व सरदार पटेलांची प्रतिष्ठाही कमी होणार नाही. महाराष्ट्राला मुंबई मिळावी यासाठी चिंतामणराव देशमुख यांनी नेहरूंच्या तोंडावर अर्थमंत्रीपदाचा राजीनामा फेकला. ‘‘तुमच्या मनात महाराष्ट्राविषयी आकस आहे’’ असे ठणकावून देशमुख संसदेच्या बाहेर पडले. त्या क्षणी चिंतामणराव देशमुख महाराष्ट्राचे कंठमणी झाले. छत्रपती शिवरायांच्या उंचीचा नेताही नाही व शिवरायांपेक्षा मोठ्या उंचीचा पुतळाही होणार नाही हे श्रीमान फडणवीस, तुम्हीही ठणकावून सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!