पोलीस महासंचालक कार्यालयातील अधीक्षक बळीराम शिंदे यांच्या घरात पोलिसांना लाखो रुपयांची रोकड सापडली आहे. सोमवारी शिंदे यांना सापळा लावून अटक करण्यात आली होती.पुण्यातील एका पोलीस अंमलदारास घरबांधणीसाठी अग्रीम हवे होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. अधीक्षक शिंदे यांनी या अग्रीम मंजुरीसाठी या अंमलदाराकडे २२ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यांनी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि १० हजारांची लाच स्वीकारताना शिंदे यांना अटक केली होती.
 मंगळवारी शिंदे यांच्या नवी मुंबई येथील घराची छडती घेतली असता पोलिसांना ७५ लाख २० हजार रुपये आणि कुटुंबियांच्या नावे असलेल्या सुमारे १४ लाख रुपयांच्या मुदतठेवी तसेच सानपाडा आणि नवी मुंबई मध्ये सदनिका एवढी बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर हल्ला
नवी मुंबई : ऐरोली येथील एका मॉल मध्ये मंगळवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास खरेदीसाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका अर्पणा गवते यांच्यावर पाच जणांनी हल्ला चढावला आहे. यात गवते या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी वाशीतील फोर्टीज रूग्णालयातील अतीदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांमध्ये तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश असून यातील एका महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा हल्ला राजकीय वैमन्स्यातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. दिघा प्रभाग क्रमांक ४ च्या नगरसेविका असलेल्या अर्पणा गवते े खरेदीसाठी येत होत्या. मॉल जवळ कारमधून उतर असताना तोंडाला रूमाल बांधलेल्या तीन महिलांनी त्यांना मारहाण करण्यास केली.

लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू
शहापूर  : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लोकलमधून पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना मंगळवारी घडल्या. मध्य रेल्वेच्या खडवली-टिटवाळा दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मुरबाड तालुक्यातील रामचंद्र धोंडू विशे (६८) यांचा सकाळी सहाच्या सुमारास लोकलमधून पडल्याने मृत्यू झाला, तर वासिंद-आसनगाव दरम्यान सकाळी १० च्या सुमारास विठ्ठल पांडुरंग शेंगाळ (२१) या तरुणाचा आसनगाव लोकलमधून पडून मृत्यू झाला.  

दिंडोशी येथे तरुणाची हत्या
मुंबई : दिंडोशी येथे राहणाऱ्या रमेश जाधव या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कोलडोंगरी रोड परिसरातील बबनराय चाळीत राहणाऱ्या रमेशचे मंगळवारी संध्याकाळी एका व्यक्तीबरोबर भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसन मारामारीत झाले. या दरम्यान रमेशवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या भांडणाचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत.