News Flash

अक्सा नव्हे, ‘हादसा बीच’!

‘अक्सा बीच’ उन्हाळी सुट्टीत येथे गर्दी करणाऱ्या पर्यटकांसाठी ‘हादसा बीच’ ठरू पाहात आहे.

aksa-beach
‘अक्सा बीच’ उन्हाळी सुट्टीत येथे गर्दी करणाऱ्या पर्यटकांसाठी ‘हादसा बीच’ ठरू पाहात आहे.

उत्साही पर्यटकांना आवरण्याचे जीवरक्षकांचे प्रयत्न तोकडे

मुंबईसह आसपासच्या भागातील नागरिकांसाठी समुद्रसहलीसाठीचे एक चांगले ठिकाण असलेला ‘अक्सा बीच’ उन्हाळी सुट्टीत येथे गर्दी करणाऱ्या पर्यटकांसाठी ‘हादसा बीच’ ठरू पाहात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या समुद्रकिनारी होणाऱ्या अपघातांच्या घटना जास्त असतानाही या ठिकाणी आजही पुरेशी सुरक्षाव्यवस्था करण्यात आलेली नाही. सध्याच्या सुट्टीच्या हंगामात या ठिकाणी दररोज शेकडो पर्यटक येत असतानाही संपूर्ण किनाऱ्यावरील सुरक्षेची जबाबदारी अवघ्या आठ जीवरक्षकांवर आहे. अनेकदा उत्साही पर्यटक समुद्रात खोलवर जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यांना अडवणाऱ्या जीवरक्षकांनाच पर्यटकांच्या अरेरावी वा वादावादीला तोंड द्यावे लागत आहे.

अक्साचा किनारा धोकादायक म्हणून ओळखला जातो. १९९९ पासून आजपर्यंत येथे ८० जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ९ जुलै २००० रोजी या ठिकाणी मालाड (पूर्व) येथील १२ तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. २०१६ला बुडणाऱ्या ४५ जणांना जीवरक्षकांनी वाचवले आहे. त्यात तीन जण आत्महत्या करण्यासाठी आले होते. गेल्या दोन महिन्यांत येथे बुडण्याच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. सुमारे तीन किलोमीटर पसरलेल्या इथल्या किनाऱ्यावर पोहणे धोकादायक असल्याने तो ‘हादसा बीच’ म्हणूनच ओळखला जातो.

उन्हाळ्यात मोठय़ा संख्येने पर्यटकांनी हा किनारा गजबजतो. सुट्टीत शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी चार ते पाच हजार पर्यटक येथे हजेरी लावतात. तर उर्वरित दिवशी एक ते दोन हजार पर्यटक हमखास या समुद्रकिनारी पाहायला मिळतात. मात्र सध्या या ठिकाणी चार पाळ्यांमध्ये केवळ आठ जीवरक्षक कार्यरत आहेत. पर्यटकांची वाढलेली संख्या लक्षात घेता आठ जीवरक्षक अपुरे आहेत. त्यातच अतिउत्साही पर्यटकांना आवरताना जीवरक्षकांना नाकीनऊ होते. अनेकदा पर्यटक व जीवरक्षक यांच्यात खटकेही उडतात.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी सहकुटुंब अक्सा समुद्रकिनारी फिरायला आले होते. समुद्राला भरती असून पोहण्यासाठी जाऊ  नका, अशी सूचना जीवरक्षकाने केली. तरीही त्यांचे न ऐकता ते पोहण्याकरिता पाण्यात उतरले. त्याच वेळी भरती आल्याने ते चारही बाजूने पाण्याने घेरले गेले. त्या वेळी जीवरक्षकाने दीड किलोमीटर आत पाण्यात जात त्यांचे प्राण वाचवले.

 

वर्ष     वाचविले  बुडाले

१९९९   ३४         ८

२०००   ११       १८

२००१   १२       ४

२००२   १३       ०

२००३   ११        ३

२००४   १५       ४

२००५   ८        ५

२००६   २४     २

२००७   ५५     ४

२००८   ५४     ७

२००९   ६२     ६

२०१०   २४     ४

२०११   २६     ५

२०१२   ५८      ४

२०१३   ४१      ३

२०१४   १७      २

२०१५   ३७      ४

‘काही भागात उंचवटे तर काही भागात खड्डे अशी अक्सा किनाऱ्याची रचना आहे. ओहोटीच्या वेळेस पर्यटक तेथे पोहायला जातात. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भरती सुरू झाली की ते पाण्यात ओढले जातात,’ असे जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी यांनी सांगितले. ‘येथे प्रेमीयुगुल, मालवणी परिसरातील तरुण मुले वरचेवर येतात. इथल्या धोक्याची जाणीव असतानाही ते आमची नजर चुकवून समुद्रात पोहायला उतरतात. पर्यटकांना धोक्याची

कल्पना असतानाही ते समुद्रात जातात. त्यामुळे या किनाऱ्यावरील बुडण्याच्या घटना पाहता सरकारने हा समुद्र धोकादायक जाहीर करून पर्यटकांवर बंदी आणावी,’ अशी सूचनाही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2017 4:55 am

Web Title: short of lifeguards at aksa beach
Next Stories
1 कचरा वर्गीकरणामुळे कचरावेचक बेरोजगार
2 वैद्यकीय निष्काळजीच्या आरोपांतून १५ वर्षांनी मुक्तता!
3 चकमकफेम प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत
Just Now!
X