पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे दुधाच्या पुरवठय़ावर परिणाम; खव्याच्या कमतरतेमुळे चॉकलेट, बेसन, सुकामेव्याच्या पदार्थाना प्राधान्य

रसिका मुळय़े, मुंबई</strong>

सांगली, कोल्हापूर येथे आलेला पूर पूर्णपणे ओसरला असला तरी, या जिल्ह्य़ांतून होणारा दूधपुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही. परिणामी दुग्धजन्य किंवा खव्यापासून बनवलेल्या मिठायांचे उत्पादन यंदा घटण्याची शक्यता आहे. याला पर्याय म्हणून मिठाई व्यावसायिकांनी सुकामेवा, बेसन, चॉकलेट यांपासून बनवलेल्या मिठाया तयार करण्यास प्राधान्य दिले आहे.

पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांना सांगली, कोल्हापूर, कराड या भागांतून दुधाचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा होते. पुराचा तडाखा बसलेले हे जिल्हे हळूहळू सावरत असले तरी अद्यापही सर्व घटक सुरळीत झालेले नाहीत. पुरामध्ये गुरे वाहून जाण्याचा घटना, यंत्रसामग्रीचे नुकसान, मोडलेले गोठे, विस्कळीत झालेला पाणीपुरवठा, वाहतुकीच्या अडचणी यांमुळे दूध उत्पादन आणि त्याच्या एकत्रीकरणावर परिणाम झाला. अद्यापही दुधाचा तुटवडा पुरेसा भरून निघालेला नाही. काही प्रमाणात कर्नाटकमधूनही दूध राज्यात येते. मात्र तेथेही पुराचा काहीसा परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम यंदाच्या उत्सवावरही होणार असल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवाच्या काळात दुधाच्या पदार्थाना मागणी वाढते. वर्षभर न खाल्ल्या जाणाऱ्या माव्याच्या मोदकांना गणेशोत्सवात मागणी असते. त्याचप्रमाणे पेढे, बर्फी, गौरीच्या दिवशी बासुंदी, श्रीखंड यांसारखी पक्वान्ने यांची मागणी वाढते. यंदा मात्र पुरेसे दूध उपलब्ध होत नसल्यामुळे या पदार्थाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

‘गोकुळ डेअरीचे दिवसाचे दूध उत्पादन हे साधारण ८ लाख लिटर होते. त्यातील साधारण ७ लाख लिटर दुधाचा पुरवठा मुंबईमध्ये होतो. पुरानंतर दरदिवशी ६० हजार ते ८० हजार लिटर उत्पादन घटले आहे. दूध उत्पादन पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून काही कालावधी लागेल. मात्र सणाच्या दिवसांमध्ये पुरवठय़ामध्ये खंड पडू नये असा प्रयत्न करण्यात येत आहे, असे गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सांगितले. बाहेरचे दूध बंद झाल्यामुळे मुंबईतील मिठाई उत्पादकांना स्थानिक पातळीवर मिळणारे दूध आणि परराज्यातील पुरवठय़ावर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र नेहमीपेक्षा गणेशोत्सवाच्या काळातील तिप्पट मागणीसाठी हे दूध अपुरे ठरणार असल्याचे मिठाई उत्पादक सांगतात.

सुकामेव्याच्या मिठाईचा पर्याय

दुधाचे उत्पादन घटल्यामुळे सुकामेव्याची मिठाई, बेसनापासून तयार होणारे पदार्थ, काही प्रमाणात चॉकलेट किंवा दूध कमी लागेल असे पर्याय मिठाई उत्पादकांनी शोधले आहेत. ठाण्यातील प्रशांत कॉर्नरच्या उत्पादन विभागाचे प्रमुख संजय सोनावणे यांनी सांगितले, ‘पुरामुळे निर्माण झालेल्या दुधाच्या तुटवडय़ाचा परिणाम नक्कीच जाणवतो आहे. दरवर्षीपेक्षा दुधाच्या पदार्थाचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी कमी झाले आहे. सणासुदीमुळे मागणी आहे. त्यामुळे आम्ही प्राधान्याने सुकामेव्याच्या पदार्थावर भर दिला आहे. ग्राहकांनाही त्याची कल्पना दिली जाते.’