मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर बीएमसीच्या मदतीनं स्वत:चं रुग्णालय सुरू करणार आहे. सिद्धिविनायक न्यास आणि बीएमसीच्या भागीदारीतून दादर परिसरात रुग्णालय सुरू करण्याचा विचार मंदिर न्यासाचा आहे.  सिद्धिविनायक न्यासाद्वारे अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांकरता आर्थिक मदतही पुरवली जाते. मात्र आता सिद्धिविनायक न्यास स्वत: गरजूंच्या उपचारांसाठी अद्यावत सोयींनी युक्त असं रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्रानं दिली आहे. बीएमसी आणि मंदिर न्यासानंदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दादरमधील गोखले रोड परिसरातील पालिकेच्या जागेवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. हे रुग्णालय पालिका बांधणार आहे त्यानंतर या रुग्णालयाच्या कामकाजाची जबाबदारी ही न्यासाची असणार आहे. रुग्णालयात सर्व प्रकारच्या आधुनिक सोयी सुविधा असणार आहेत मात्र रुग्णांचा वैद्यकीय खर्च अत्यंत अल्प असणार आहे अशी माहितीही सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

सिद्धिविनायक न्यासाला दरवर्षी ९० कोटींहून अधिकची देणगी येते. या देणगीमधील सर्वाधिक रक्कम ही सामाजिक कार्यासाठी वापरली जाते. या रक्कमेतले जवळपास १२ कोटी हे गरीब रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी खर्च केले जातात.