‘राणीच्या हारा’सोबत चौपाटीचेही दर्शन घडणार

देशी-विदेशी पर्यटकांना मरिन ड्राईव्ह येथील ‘राणीच्या हारा’चे आणि गिरगाव चौपाटीचे ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घेता यावे यासाठी मलबार हिल नियंत्रण कक्षामध्ये खुला दर्शनीय मनोरा उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या दर्शनीय मनोऱ्याची उभारणी झाल्यानंतर पुन्हा एकदा देशी-विदेशी पर्यटकांचे पाय मलबार हिलकडे वळू लागतील.

मलबार हिल येथे पालिकेच्या जल विभागाचे नियंत्रण कक्ष आहे. येथून दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. पूर्वी या ठिकाणी ‘नाझ’ नावाचे हॉटेल होते. या हॉटेलमधून मरिन ड्राईव्ह येथील ‘राणीचा हार’ आणि गिरगाव चौपाटीचे दर्शन घडत होते. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांची कायम येथे गर्दी होत असे. मात्र ‘नाझ’ हॉटेलचा भाडेकरार संपुष्टात आल्यानंतर पालिकेने ही वास्तू ताब्यात घेतली आणि त्याचा वापर जल विभागाच्या कार्यालयासाठी केला जात आहे. ही वास्तू अत्यंत जुनी झाली असून मोडकळीस आली आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षाची पुनर्बाधणी करण्यात येणार असून त्यावरील खुल्या जागेचा वापर दर्शनीय मनोरा म्हणून करण्यात येणार आहे.

या वास्तूची दुरुस्ती आणि दर्शनीय मनोऱ्याच्या उभारणीसाठी तब्बल ६.७४ कोटी  रुपये खर्च पालिकेला येणार असून निविदा प्रक्रियेमध्ये हे काम डी. बी. इन्फ्राटेक कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी वास्तुविशारद पंकज जोशी यांची प्रकल्प व्यवस्थापक व सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जल विभागाचे हे नियंत्रण कक्ष सागरी भरतीच्या सीमेपासून ५०० मीटरच्या आत आहे. त्यामुळे या कक्षाच्या पुनर्बाधणीसाठी परवानगी मिळावी म्हणून महाराष्ट्र सागर किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाला पत्र पाठविण्यात आले होते. या प्राधिकरणाने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले असून लवकरच कंत्राटदाराला कार्यादेश देऊन बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे.