६ एप्रिलपर्यंत दर आठवडय़ाला चार दिवस, नंतर सलग २० दिवस पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद

मुंबई : शीव उड्डाणपुलाचे बेअिरग बदलण्याचे काम १४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून ६ एप्रिलपर्यंतच्या प्रत्येक आठवडय़ात चार दिवस आणि ६ एप्रिलनंतर सलग २० दिवस पुलावरील वाहतूक पूर्ण बंद राहील. पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि ठाणे येथून मुंबईत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे शीव सर्कल भागात वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

शीव उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम वर्षभरापासून रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी आयआयटी मुंबईने शीव उड्डाणपुलाची संरचनात्मक तपासणी केल्यानंतर १७० बेअिरग बदलण्यास सांगितले होते. डिसेंबर २०१८ पासून पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर मागील वर्षभरात तीन ते चार वेळा दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे ठरले, मात्र कामाला सुरुवातच झाली नव्हती. अखेरीस १४ फेब्रुवारीपासून बेअिरग बदलण्याच्या कामास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सुरुवात होत आहे.

‘बेअिरग बदलण्याचे काम सलग न करता आठवडय़ातील चार दिवसच काम करण्याचा निर्णय वाहतूक विभाग आणि महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. १४ फेब्रुवारीपासून दर आठवडय़ात गुरुवारी रात्री १० ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम केले जाणार असल्यामुळे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील. एप्रिलअखेर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल,’ असे नियोजन केल्याचे महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले.

बेअिरग बदलण्याचे काम शहरात पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात होत आहे. काम वेगाने पूर्ण होण्यासाठी ३०० मेट्रिक टन क्षमतेचे जॅक अधिक संख्येने मागवले आहेत. बेअिरग बदलण्याच्या कामादरम्यान वाहतूक पोलिसांना मदतीसाठी ३० ट्रॅफिक वॉर्डनदेखील दिल्याचे महामंडळाने सांगितले.

अवजड वाहनांमुळे कोंडी अटळ

पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे-कुर्ला संकुलात जाण्यासाठी बीकेसी कनेक्टर हा उन्नत मार्ग वाहतुकीस खुला झाल्यानंतर शीव सर्कलमधील वाहतुकीवरचा भार कमी झाला असला तरी वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी वाढली होती. शीव उड्डाणपूल बंद झाल्यानंतर शीव सर्कल येथे वाहतूक कोंडी वाढणार आहे. मात्र बीकेसी कनेक्टर सध्या तरी दुचाकी आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद आहे. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक शीव सर्कलवरूनच होत राहील.

शीव उड्डाणपुल वाहतूक बंदचे वेळापत्रक

  •  १४ फेब्रुवारी रात्री १०.०० ते १७ फेब्रुवारी सकाळी ६.००
  •   २० फेब्रुवारी रात्री १०.०० ते २४ फेब्रुवारी सकाळी ६.००
  • २७ फेब्रुवारी रात्री १०.०० ते २ मार्च सकाळी ६.००
  •   ५ मार्च रात्री १०.०० ते ९ मार्च सकाळी ६.००
  •  १२ मार्च रात्री १०.०० ते १६ मार्च सकाळी ६.००
  •  १९ मार्च  रात्री १०.०० ते २३ मार्च सकाळी ६.००
  •  २६ मार्च रात्री १०.०० ते ३० मार्च सकाळी ६.००
  •  २ एप्रिल रात्री १०.०० ते ६ एप्रिल सकाळी ६.००
  •   ६ एप्रिलपासून : सलग २० दिवस वाहतूक बंद