स्वयंचलित पद्धतीने सूचना मिळणार

रोज लाखो वाहनचालकांना लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगात सूचना देऊन शहरातील वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्रीकरण करणारी सिग्नल यंत्रणा आता ‘स्मार्ट’ करण्यात आली आहे. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी ज्या दिशेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची (वाहनचालकांची) संख्या अधिक असेल त्यानुसार ही सिग्नल यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने वाहतुकीचे नियंत्रण करणार आहे. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी स्मार्ट सिग्नल यंत्रणा राबवणारी मुंबई महापलिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
सध्या मुंबई व उपनगरात महापालिकेतर्फे बसवण्यात आलेले ५९० सिग्नल कार्यरत आहेत. त्यापकी २५५ ठिकाणी स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. रस्त्यावरील गर्दीच्या प्रमाणानुसार या सिग्नलचा कालावधी कमी-जास्त होतो, हे या सिग्नल यंत्रणेचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. याशिवाय या सिग्नल यंत्रेणेच्या सर्व बाजूंनी रस्त्यावरील वाहनांची संख्या मोजण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या यंत्रणेमुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ओघ कोणत्या दिशेला सर्वाधिक आहे, त्या दिशेला ‘हिरवा’ सिग्नल जास्त वेळ सुरू ठेवण्यात येणार आहे.
यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यास मदत होईल असा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच लवकरच ३३५ ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
या पद्धतीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे एखाद्या वाहतूक सिग्नल मध्ये किंवा वाहन शोधक कॅमेऱ्यामध्ये काही बिघाड किंवा तांत्रिक समस्या उत्पन्न झाल्यास त्याची माहिती लगेचच वरळी येथील वाहतूक पोलीस मुख्यालय व महापलिकेच्या वरळी येथील अभियांत्रिकी संकुलात संगणकीय प्रणालीद्वारे थेट प्राप्त होणार आहे.