22 September 2020

News Flash

रेल्वे तिकिटांची ‘तस्करी’ विमानमार्गे

उन्हाळी सुटय़ांमध्ये मुंबईहून ‘मुलुखा’ला जाण्यासाठी हजारो प्रवाशांची गर्दी आणि उपलब्ध तिकिटे यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन काही ‘डोकेबाज’ मंडळींचा रेल्वे तिकिटांच्या ‘तस्करी’चा प्रयत्न रेल्वे पोलिसांच्या

| April 30, 2014 04:12 am

उन्हाळी सुटय़ांमध्ये मुंबईहून ‘मुलुखा’ला जाण्यासाठी हजारो प्रवाशांची गर्दी आणि उपलब्ध तिकिटे यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन काही ‘डोकेबाज’ मंडळींचा रेल्वे तिकिटांच्या ‘तस्करी’चा प्रयत्न रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने हाणून पाडला. रेल्वे पोलिसांच्या तावडीत सापडायला नको म्हणून या दलालांनी विमानमार्गे तिकिटांचे गठ्ठे बिहारहून मागवले होते. मात्र मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोघांना अटक करत साडेतीन लाख रुपयांची तिकिटे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. वाराणसी, अलाहाबाद अशा अनेक तिकिटांचा यात समावेश आहे.
उन्हाळी सुटीत उत्तरेतील आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड असते. मध्य रेल्वेतर्फे विशेष गाडय़ा सोडूनही या गर्दीला त्या अपुऱ्या पडतात. प्रतीक्षा यादीतील तिकिटांची संख्याही हजाराच्या वर जाते. अशा परिस्थितीत जादा दरांतही प्रवासी तिकिटे खरेदी करायला तयार असतात. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत इम्रान आणि प्रमोद शेलार या दोन दलालांनी आपले ‘बिहार कनेक्शन’ वापरत तेथील तिकीट दलालांकडून साडेतीन लाख रुपयांची तिकिटे काढून घेतली. मुंबईला येताना रेल्वेमार्गाने आल्यास पकडले जाण्याची भीती असल्याने त्यांनी विमान प्रवासाचा पर्याय निवडला.
मात्र रेल्वे सुरक्षा दल, तिकीट दलालांविरोधी पथक, दक्षता विभाग यांनी एकत्रितपणे या दलालांविरोधात विविध तिकीट आरक्षण केंद्रांवर आपले लक्ष केंद्रित केले होते. त्यापैकीच एका आरक्षण केंद्रावर त्यांना प्रमोद आणि इम्रान या दोघांबद्दल माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सहार कार्गो भागात मंगळवारी प्रमोद शेलार आणि इम्रान या दोघांना अटक केली. या दोघांकडून ही तिकिटेही हस्तगत करण्यात आली. या दलालविरोधी पथकात श्याम राणे, एस. के. सिंग, पी. पी. कोरी, एच. एस. यादव यांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2014 4:12 am

Web Title: smuggling of railway ticket by airways
Next Stories
1 खासगी तंत्रशिक्षण महाविद्यालयांच्या खर्चाला ४५ टक्क्य़ांची मर्यादा
2 ‘राष्ट्रपतीपदका’चा चौदा वर्षांचा वनवास संपला
3 ‘२५ टक्के प्रवेशां’ना अत्यल्प प्रतिसाद
Just Now!
X