अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवणार
पालिकेतर्फे नालेसफाईच्या कामांना मुलुंड परिसरात नुकतीच सुरुवात झाली असताना मंगळवारी सकाळी मुलुंड पूर्व येथील गवाणपाडा अग्निशमन केंद्रासमोर नीलमनगर नाल्यात एक डंपरभर घनकचरा टाकण्यात आला आहे. प्रकरणाची गंभीर दखल टी विभाग साहाय्यक पालिका आयुक्त सपकाळे यांनी घेतली असून याबाबतचे पुरावे गोळा करून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र तत्पूर्वी हा घनकचरा पंचनामा करून उचलला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुलुंड पूर्व परिसरातील नीलमनगर हा सर्वात मोठा नाला आहे. ऐरोली खाडीला जाऊन मिळणारा हा नाला मुलुंड पश्चिमेकडून वाहत येतो.
या नाल्याला नीलमनगर जवळ ठाण्याकडून येणारा आनंद नगर नालाही मिळतो. नीलमनगर परिसरात या नाल्यावर एकूण तीन पूल बांधण्यात आलेले आहेत.
गवाणपाडा अग्निशमन केंद्रासमोर असलेल्या पुलाला लागूनच अज्ञातांनी घन कचऱ्याचा अख्या डंपर ओतल्याचे लोकसत्ता प्रतिनिधीने याबाबत साहाय्यक पालिका आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्यावर या घटनेची गंभीर दखल त्यांनी घेतली. या घनकचऱ्याचा पंचनामा नोंदवून तो उचलण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचे सपकाळे यांनी सांगितले.
या घनकचऱ्यात नॉयलॉनच्या गोणीतून भरलेला घरगुती कचरा, विटा, माती, सिमेंट, प्लॅस्टर आदी घटकांचा समावेश आहे. काही महिन्यापूर्वी या नाल्याच्या बाजूने पदपथ आणि त्याला लागून हिरवळ तयार करण्यात आली होती. तिचीही येथे दुरवस्था पाहायला मिळते. शिवाय घन कचऱ्याचा काही भाग हा या पदपथावरही टाकण्यात आला आहे.
मुलुंड परिसरात मोकळ्या भूखंडावर मोठय़ा प्रमाणात घनकचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून याबाबत पालिकेचे कर्मचारी कचरा टाकणाऱ्यांचा शोध आणि पंचनामा करून कारवाई करतात. मात्र मोठय़ा नाल्यात कचरा टाकण्याचे प्रकरण गंभीर असल्याने याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे साहाय्यक पालिका आयुक्तांनी सांगितले.