टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर व्यायामशाळांमध्येही मोठय़ा संख्येने लोक येऊ लागले आहेत. त्याचबरोबर दादर आणि आसपासच्या परिसरात मेट्रोची कामे सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाने व्यायामशाळांमधील कर्मचारी व प्रशिक्षक, तसेच मेट्रोचे काम करणाऱ्या कामगारांसाठी करोना चाचणी शिबिराचे आयोजन केले आहे.

मुंबईतील करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आजही मुंबईत १५ हजारापर्यंत चाचण्या करण्यात येत आहेत. टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल झाल्यानंतर आता मुंबईतील जवळजवळ सर्व व्यवहार पूर्णपणे सुरू झाले आहे. २५ ऑक्टोबरपासून मुंबईतील व्यायामशाळाही सुरू झाल्या आहेत. मोठय़ा संख्येने लोक व्यायामशाळांमध्ये नियमितपणे येऊ लागले आहेत. त्यामुळे जी उत्तर विभागातील दादर, माहीम, धारावी भागातील व्यायामशाळा कर्मचाऱ्यांसाठी सहा ठिकाणी करोना चाचणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दीघावकर यांनी दिली.

दादरमध्ये पी. एल. काळे मार्ग, बाळ गोविंद रोड, एल. जे. रोड, माहीम, गोखले रोड, वीर सावरकर रोड, डी. एल. वैद्य रोड या ठिकाणी मोबाइल व्हॅनमध्ये प्रतिजन व आरटीपीसीआर चाचण्या के ल्या जाणार आहेत. हे शिबीर पुढील आठ दिवस चालणार आहे. पहिल्या दिवशी केवळ दहा ते बारा जणांनी या सुविधेचा लाभ घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. धारावी येथे मुंबई मेट्रो धारावी जंक्शन येथे मेट्रोच्या कामगारांसाठी चाचणी शिबीर भरवण्यात आले आहे. आतापर्यंत या परिसरातील ब्युटी पार्लर, ज्वेलर्सची दुकान, कपडय़ांची दुकाने अशा विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी करोना चाचणी शिबिरे भरवण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ज्या लोकांचा दिवसभरात विविध लोकांशी संपर्क येतो अशांसाठी ही चाचणी शिबिरे आयोजित के ल्याचेही त्यांनी सांगितले.

११४ रुग्ण माहीममध्ये

जी उत्तर परिसरात सध्या २२२ उपचाराधीन रुग्ण असून त्यापैकी सर्वाधिक जास्त म्हणजे ११४ रुग्ण माहीममध्ये, तर धारावीत १५ आणि दादरमध्ये ९३ रुग्ण आहेत. जी उत्तर मध्ये आतापर्यंत १३,५२४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.