महामंडळाच्या उदासीनतेमुळे बसची वर्षभरात धाव नाहीच; एसटीच्या ७० वर्षांचा प्रवास उलगडणारे फिरते प्रदर्शन

एसटीच्या ७० वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या विश्वरथ बस या फिरत्या प्रदर्शनाचा प्रवास थांबला आहे. एसटी महामंडळाच्या उदासीनतेमुळे गेल्या वर्षभरात बसची एकही धाव होऊ शकलेली नाही. बस चालविण्यासाठी खिशातूनच भरावे लागणारे पैसे, एसटीच्या स्थानिक पातळीवर न मिळणारा प्रतिसाद अशा अडचणी येऊनसुद्धा विश्वरथ चालविणारे तरुण प्रचारकही महामंडळाच्या उदासीनतेमुळे हतबल झाले आहेत. ही बस वर्षभरापूर्वी आरटीओकडे वहनयोग्यता नूतनीकरण प्रमाणपत्रासाठी जाताच त्यानंतर एसटी महामंडळाने पुन्हा बस चालवण्यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही.

पुणे ते अमहदनगर अशी एसटीची पहिली बस १९४८ साली धावली व तेव्हापासून एसटीचा प्रवास अविरत सुरू आहे. साधी बस ते आता वातानुकूलित बस गाडय़ादेखील एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. हा इतिहास सांगण्यासाठी एक प्रदर्शनरूपी विश्वरथ नावाने बस चालविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. यामागील कल्पना ही सहा ते सात उच्चशिक्षित तरुणांची.

या तरुणांनी सप्टेंबर २०१६ पासून सुरुवातीच्या आठ महिन्यांत ३६ जिल्ह्य़ांपैकी मुंबई, ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्य़ांपर्यंत विश्वरथ बस फिरवून एसटीचा इतिहास शहरी व ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवला. त्याला मोठय़ा संख्येने प्रतिसादही मिळाला. मात्र गेल्या वर्षभरापासून ही बस धावू शकलेली नाही. रस्त्यावर वाहन धावण्यास योग्य आहे का यासाठी प्रत्येक वर्षांला आरटीओकडे अवजड वाहन वहनयोग्यता नूतनीकरण प्रमाणपत्रासाठी घेऊन जावे लागते. वर्षभरापूर्वी विश्वरथ बस आरटीओकडे गेल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर विश्वरथ बस पुन्हा सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाकडून हालचाल मात्र झालेली नाही.

यासदंर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी विश्वरथ बस एसटीप्रेमींना कायमस्वरूपी देण्यात आली नव्हती. बहुतेक ती फक्त काही महिन्यांकरिताच देण्यात आल्याची शक्यता आहे. तरीही त्यांना बस चालवायची असेल तर आम्हाला काहीच हरकत नसल्याचे देओल यांनी स्पष्ट केले. परंतु ३६ जिल्ह्य़ांपैकी पाच जिल्ह्य़ांत विश्वरथ बसने प्रवास केल्याचे सांगताच त्याची माहितीच देओल यांना नसल्याचे समोर आले.

अधिकचा खर्च तरुणांच्या खिशातून

फिरत्या प्रदर्शनाचा खर्च म्हणून एसटी महामंडळाकडून सहा ते सात तरुणांना अवघे ३० हजार रुपये देण्यात आले. मात्र आठ महिन्यांत प्रदर्शनरूपी बसमधील डिझाइन, लाइट्स, इंधन, बसच्या पॅनलचा खर्च दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत गेला. जादा झालेला खर्चही सात तरुणांनी आपल्या खिशातूनच भरला. तरीही ही बस उत्साही तरुणांनी सुरूच ठेवली. राज्यातील स्थानिक पातळीवरील काही ठिकाणी या प्रदर्शनाला एसटी कर्मचाऱ्यांकडूनच सहकार्य मिळाले नाही. त्यामुळेही अनंत अडचणींचा देखील सामना करावा लागल्याचे विश्वरथ प्रदर्शन बसचा प्रचारक रोहित धेंडे याने सांगितले. एसटीचा इतिहास आम्हा तरुणांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. परंतु त्याबाबत अद्याप काही हालचाली एसटीकडूनच झाल्या नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली.