मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालय हे इंग्रज काळातील महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. मुंबईतील नामांकित महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ओळख आहे. आता महाविद्यालयाच्या ओळखीत आणखी एक भर पडण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नॉन ख्रिश्चन व्यक्ती रुजू होणार आहे. त्यामुळे ही निश्चितच नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. या महाविद्यालयाला १५० वर्षांचा इतिहास असून सुरुवातीला ते मिशनरीतर्फे चालविण्यात येत होते. विविध पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी हे महाविद्यालय प्रसिद्ध आहे. मुंबईबरोबरच इतर राज्य आणि परदेशातूनही विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. महाविद्यालयाची वास्तूही अतिशय जुनी आणि ऐतिहासिक असून याठिकाणी काही चित्रपटांचे शूटींगही करण्यात आले आहे.

मागील काही वर्षांत महाविद्यालयाने पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच एमबीए, पत्रकारिता, फोटोग्राफी असे अभ्यासक्रम सुरु करुन आपली आणखी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील वनस्पती विज्ञान विभागाचे प्रमुख राजेंद्र शिंदे कॉलेजचे नवे प्राचार्य म्हणून रुजू होण्याची शक्यता आहे. शिंदे हे महाविद्यालयाचे २४ वे प्राचार्य असतील. येत्या १ सप्टेंबरपासून ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ख्रिश्चन नसलेल्या प्राचार्याची नेमणूक करणारे सेंट झेवियर्स हे भारतातील एकमेव ख्रिश्चन कॉलेज ठरण्याची शक्यता आहे.

नेरुळमध्ये राहणारे राजेंद्र शिंदे मागील ३५ वर्षांपासून महाविद्यालयात कार्यरत आहेत. १९८३ मध्ये ते हर्बेरिअम क्युरेटर म्हणून रुजू झाले. २०११ मध्ये ते कॉलेजचे उपप्राचार्य झाले आणि आता ते प्राचार्य होणार आहेत. आपल्या या नियुक्तीबाबत बोलताना शिंदे म्हणाले. ‘कॉलेज व्यवस्थापनाने प्राचार्यपदी मला नामनिर्देशित करून एक चांगला संदेश दिला आहे. माझी नियुक्ती झाल्यास ती माझ्या सहकाऱ्यांसाठी भविष्यात नक्कीच मार्गदर्शी ठरेल.’ नाशिक येथे शालेय शिक्षण झालेले शिंदे पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. १९७८ मध्ये त्यांनी सेंट स्टेनिसलॉसमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि १९८३मध्ये वनस्पती शास्त्रविषयातून पदवी घेऊन ते सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये रुजू झाले.