२१ शाळांना नववी, दहावीचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी

मुंबई : शाळा व्यवस्थापन, पालक, लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेत मुंबईतील विविध माध्यमांच्या सुमारे २१ शाळांना स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यास शिक्षण समितीने गुरुवारी हिरवा कंदील दाखविला. यामुळे आता प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अन्य शाळांमध्ये धाव घ्यावी लागणार नाही. स्वयंअर्थसहाय्यता तत्त्वावर हे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी पालिकेच्या निधीतून त्याचा खर्च भागविण्यात येणार आहे.

गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी मुंबई महापालिकेने ठिकठिकाणी मराठीसह विविध माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. एकेकाळी या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढत गेली आणि त्यानंतर बहुसंख्य पालक आपल्या मुलांना त्या शाळांमध्ये दाखल करू लागले. तसेच अनेक कुटुंबे मुंबईतून स्थलांतरित झाली. परिणामी, पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरू लागली. पटसंख्या सावरण्यासाठी पालिकेने विद्यार्थ्यांना २७ शाळोपयोगी वस्तू देण्यास सुरुवात केली. मात्र आजही विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखण्यात पालिकेला हवे तसे यश मिळू शकलेले नाही. पालिकेच्या प्राथमिक शाळांची संख्या मोठी आहे. तुलनेत माध्यमिक शाळांची संख्या कमी आहे. यामुळे प्राथमिक शाळांमधून शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना इयत्ता नववीसाठी अन्य शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. अनुदानित वा विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ही समस्या भेडसावत असते.

प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी काही संस्थांकडून सातत्याने विनंती करण्यात येत होती. शालेय व्यवस्थापन समिती, पालक, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणारी मागणी, भौतिक सुविधांसह उपलब्ध वर्गखोल्या, विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, शाळेच्या आसपासच्या परिसरात उपलब्ध नसलेली पालिकेची संबंधित माध्यमाची माध्यमिक शाळा आदी बाबी लक्षात घेऊन पालिकेने सहा माध्यमांच्या शाळांना स्वयंअर्थसहाय्याने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षण समितीला सादर केला होता. या प्रस्तावाला शिक्षण समितीने गुरुवारी मंजुरी दिली. यामध्ये चार मराठी, सहा हिंदी, आठ इंग्रजी, ऊर्दू, तामिळ आणि तेलुगू प्रत्येकी एक अशा २१ शाळांचा समावेश आहे. या शाळा २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून नववीचे वर्ग सुरू करता येणार आहेत. त्याचबरोबर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये या २१ शाळांमध्ये इयत्ता १० वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

पालिकेच्या निधीतून खर्च

या शाळांमधील नववी आणि दहावीच्या वर्गांना स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर मंजुरी देण्यात आली असली तरीही पालिकेच्या निधीतूनच त्यासाठी लागणारा खर्च भागविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या इत्यादी शैक्षणिक साहित्य व सामग्रीचा पुरवठा, तसेच पूरक आहार योजनाही लागू करण्यात आली आहे.