प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) रविवारी ५९१ किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा केले आहे. तर, ३ लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल केला. राज्यातील सर्व महत्वाच्या शहरांमध्ये शनिवारपासून संबंधीत महापालिकेडून ही कारवाई करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धास्ती बसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळात आणखीनच भर पडली असून आता या बंदीविरोधात सूर उमटताना दिसत आहेत.


वाढते प्रदुषण आणि अस्ताव्यस्त पडलेल्या प्लास्टिकमुळे तुंबत असलेल्या नाल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण खात्याकडून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात पूर्णपणे प्लास्टिकच्या वापरावर आणि साठवणुकीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. दरम्यान, बीएमसीने रविवारी शहरात ठिकठिकाणी तपासणी मोहिम राबवली. यामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल ५९१ किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा केले आहे. तर, ३ लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे.

बीएमसीकडून रविवारी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यात सुरुवातीला व्यापारी आणि दुकानदारांना टार्गेट करण्यात आले. प्रशासनाकडून त्यांच्याविरोधात कडक धोरण अवलंबल्याने दुकानदारांमध्ये धास्ती पहायला मिळाली. या व्यापारी आणि दुकानदारांच्या मते, काही इतर उत्पादनांमध्ये प्लास्टिकच्या वापराला सूट मिळायला हवी.

२३ मार्च रोजी राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना काढली होती. त्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत याबाबत जनजागृती केल्यानंतर २३ जूनपासून राज्यभरात प्रत्यक्ष अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे.