मुंबई : राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मुंबई महापालिके त मात्र ‘बिघाडी’चे राजकारण सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये येऊ घातलेल्या वैधानिक, विशेष आणि प्रभाग समितीच्या निवडणुकांच्या निमित्ताने तर हे वाद अधिकच गडद झाले आहेत.

भाजपबरोबर काडीमोड घेतलेल्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केले. याचे पडसाद पालिकेत उमटू लागले आहेत. त्यातच पालिकेत वैधानिक, विशेष आणि प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भाजपनेही उमेदवार उतरविले आहेत.

स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे ११, भाजपचे १०, काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे  प्रत्येकी १असे  संख्याबळ आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपने उमेदवर उतरविला असला तरी शिवसेनेला धक्का देण्याइतके संख्याबळ त्यांच्याकडे नाही.  स्थायी समितीमध्ये अल्प सदस्य संख्या असतानाही काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी शिवसेनेचे पारडे जड दिसत आहे. भाजपने विरोधी पक्षांच्या पारड्यात आपली एकगठ्ठा मते टाकली तर शिवसेनेचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याकरिता भाजपला आपली उमेदवारी मागे घ्यावी लागेल. दुसरे म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ दिल्याची टीका सहन करावी लागेल. अशीच खेळी खेळून शिवसेनेला शिक्षण समितीच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवणे भाजपला शक्य आहे. भाजपकडून अशी खेळी खेळली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन आयत्या वेळी विरोधक आपल्या उमेदवारांची उमेदवारी मागे घेण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे.

त्यातच राज्यात एकत्र कार्यरत असताना महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील काही पदाधिकाऱ्यांच्या दबावतंत्रामुळे येथे विकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवता आली नाही, असा खळबळजनक आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसला विश्वासात न घेता काम करीत आहेत. शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेऊन काम केले असते तर येथेही विकास आघाडी स्थापन करता आली असती, असे रवी राजा यांनी सांगितले.