गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याची मुदत चार दिवसांनी संपुष्टात येत असूनही रस्ते अद्यापही खड्डय़ातच आहेत. याबाबत सर्वच पक्षांचे नगरसेवक तक्रारीचा सूर आळवू लागल्यामुळे गुरुवारी तातडीने आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग समिती अध्यक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी आता विभाग कार्यालयांवर सोपविण्याबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव जवळ आल्यामुळे २५ ऑगस्टपर्यंत मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. ही मुदत संपण्यास चार दिवस उरले आहेत. पावसाने उघडीप केल्यानंतरही खड्डे बुजविण्यात पालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. या पाश्र्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी गुरुवारी तातडीने प्रभाग समिती अध्यक्षांची बैठक बोलावली आहे.

ई-निविदेला विरोध
पालिकेतील कंत्राटदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने ई-निविदा पद्धतीचा अवलंब केला. मात्र कंत्राटदार ई-निविदा भरण्यास पुढेच येत नसल्यामुळे कामे रखडू लागली आहेत. त्यामुळे ही पद्धत बंद करावी अशी नगरसेवकांची मागणी आहे. दरम्यान, ई-निविदा पद्धत बंद करण्याबाबत अद्याप प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विभाग कार्यालयांच्या माध्यमातून ही कामे मार्गी लावण्याची निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.