मोटरमेनचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे त्यामुळे घरी जाणाऱ्या मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. म.रे. हे बिरूद मिरवणारी मध्य रेल्वे रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडतेच आहे. अशात शुक्रवारी ती रखडली मोटरमेननी ओव्हरटाइम न करण्याचा निर्णय घेतल्याने. मात्र मोटरमेन आणि रेल्वे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे. त्यामुळे संप मागे घेण्यात आला आहे. अशी माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

मोटरमेनचा संप मागे घेतला गेला नसता मध्य रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द होण्याची शक्यता होती. तसेच आज कार्यालय गाठताना मुंबईकरांना जसा त्रास सहन करावा लागला होता, तसाच घरी जातानाही सहन करावा लागला असता. मात्र अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आज सकाळी मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दीचा सामना मुंबईकरांना करावा लागला होता. तसेच अनेक लोकल्स रद्द झाल्याने जवळच्या अंतरावर जाण्यासाठीही वेळ लागत होता.

शुक्रवारी मध्य रेल्वेवरील नऊ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून वाहतूक १५ ते २० मिनिटाने उशिरा सुरु होती. ज्याचा प्रचंड मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागला. मोटरमेनच्या २२९ रिक्त जागा भरा, सिग्नल नियम मोडल्यास मोटरमनला कामावरुन कमी करण्याचा नियम मागे घेण्यात यावा, अशा मागण्या करत मध्य रेल्वेवरील मोटरमनकडून शुक्रवारी ओव्हरटाईम न करता नियमानुसार काम आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर हा संप मागे घेण्यात आला आहे.