News Flash

गर्दीच्या ठिकाणी कडक निर्बंध लागू करावेत!

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

संग्रहीत

मुंबई काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी

मुंबई : मुंबईमध्ये पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. असे असतानाही नागरिक मॉल्स, प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी करीत आहेत. त्यामुळे गर्दी होत असलेली ही ठिकाणे बंद करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन केली. त्याचबरोबर ट्रॉमा सेंटर, कचराभूमीमुक्त मुंबई, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आदी विषयांवरही त्यांनी आयुक्तांबरोबर चर्चा केली.

सार्वजनिक ठिकाणची वाढती गर्दी, पूर्व उपनगरांमध्ये ट्रॉमा सेंटरची उभारणी, सांडपाणी व्यवस्था, कचराभूमी आदी समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी जगताप यांच्या नेतृत्वाखाली   काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्तांची भेट घेतली.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे चिंता वाढू  लागली आहे. असे असतानाही मुंबईतील बाजारपेठा, मॉल्स, प्रर्थनास्थळांमध्ये नागरिक गर्दी करीत आहेत. त्यामुळे ही गर्दीची ठिकाणे बंद करावी, अशी मागणी जगताप यांनी आयुक्तांकडे केली. पूर्व उपनगरांमध्ये ट्रॉमा सेंटर उभारावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी वारंवार करीत आहेत. त्यामुळे तेथे ट्रॉमा सेंटर उभारावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीला आयुक्तांकडून सकारात्मक  प्रतिसाद देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रहिवाशांच्या पुनर्वसनाचा मुद्दा

नाला रुंदीकरणामुळे गोरेगावच्या शास्त्रीनगर परिसरातील भगतसिंग नगर-२ मधील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्याकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले. भगतसिंग नगर-२मधील ६३० झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन आमि कांदिवली पश्चिम येथील पोयसर नदीकाठच्या झोपडपट्टीवासीयांचे मालाड पूर्व परिसरातील आप्पा पाड्यात पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.

‘कचराभूमीसाठी जागा संपादित करा’

मुंबईत दररोज ६,५०० ते ६,८०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून क्षमता संपुष्टात आलेल्या कचराभूमींमुळे आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे ५२ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली असून ३० हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. उर्वरित २२ हेक्टर जागा पालिकेने तातडीने संपादन करावी आणि मुंबई कचराभूमीमुक्त करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 1:53 am

Web Title: strict restrictions should be imposed in crowded places akp 94
Next Stories
1 उद्यान विभागाच्या तरतुदीत दीडशे कोटींची घट
2 करोनाबाधित असूनही सार्वजनिक ठिकाणी फिरल्याप्रकरणी अभिनेत्री गौहर खानविरोधात गुन्हा
3 अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचे धोरण शिथिल
Just Now!
X