दप्तराचे ओझे कमी करण्याच्या हेतूने मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांच्या हातात दिलेले टॅब अजूनही विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरू शकत नाहीत. पहिली तिमाही संपत आल्यावर या वर्षीचे नवीन टॅब येण्यास सुरुवात झाली असली तरी हे टॅब सदोष असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यात. इतकेच नव्हे तर मागच्या वर्षी वाटलेले जूने टॅब शाळांकडे उपलब्ध होते. मात्र त्याच अभ्यासक्रम असलेले मेमरी कार्ड अद्याप उपलब्ध झाले नसल्याने तेही वापराविना पडून आहेत. यामुळे सत्ताधारी शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी टॅब उपक्रम सलग दुसऱ्या वर्षीही ‘हँग’ झाला आहे.

बॅटरीसाठी आवश्यक ते प्रमाणपत्र नसल्यामुळे रखडलेला टॅब उशीरा का होईना विद्यार्थ्यांच्या हातात आला खरा; मात्र त्यापैकी काही टॅबच्या स्क्रीनवर स्क्रॅचेस पडले आहेत; तर काहींचा डिसप्लेच अधांरात असल्याच्या तक्रारी शाळांमधून येऊ लागल्या. याचबरोबर अभ्यासक्रम डाऊनलोड केलेले ३२ जीबीचे मेमरी कार्ड काढून त्याजागी दोन किंवा चार जबीचे बनावट मेमरी कार्ड टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे. यंदा आठवीची विद्यार्थीसंख्या २१ हजार आहे, तर टॅब वाटले फक्त १३ हजार आले आहेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत टॅब पोहचणार कसे असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. शाळांमध्ये गेल्या वर्षीचे टॅब उपलब्ध आहेत. मात्र त्यात नव्या अभ्यासक्रमाच्या मेमरी कार्डच नसल्यामुळे तेही पडूनच आहेत.

हा प्रकल्प राबविण्यात अनेक प्रशासकीय अडचणीही आहेत. हा टॅब चार्ज करण्यासाठी शाळेत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. यामुळे गेल्यावर्षी प्रमाणेच याहीवर्षी विद्यार्थ्यांंना टॅब घरी द्यायचे की शाळेतच ठेवायचे असा प्रश्न शाळा प्रमुखांना पडला आहे.

याबाबत नुकत्याच पार पडलेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यात शिक्षण समिती सदस्य शिवनाथ दराडे यांनी प्रकल्प चांगला असला तरी तो योग्य पद्धतीने राबविला जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत यामुळे प्रकल्पाचा हेतू सफलच होत नसल्याची टीका केली. तसेच कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्याबाबतही चर्चा झाली.