शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील घोटाळा अधिसभेत उघड

परीक्षेला न बसताच हजेरी लावण्याची इतकेच नाही तर परीक्षेत उत्तीर्ण होण्याची किमया कल्याणमधील एका शिक्षणशास्त्र महाविद्यालयात साधता येत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान अशी पदवी घेणारी एक शिक्षिकाच आहे. एका राजकीय नेत्याच्या सचिवाच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालातील घोळानंतर उघड झालेल्या या गैरप्रकारामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अंधाधुंद कारभारच अधोरेखित झाला आहे.

विद्यापीठाच्या अधिसभेत गुरुवारी हा गैरप्रकार समोर आला. कल्याण येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात परीक्षेला न बसताच विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्याचे अधिसभा सदस्य मिलिंद साटम यांनी दाखवून दिले. एका शाळेतील शिक्षिका या महाविद्यालयांत बी.एड्. करत होत्या. पूर्ण वेळ नोकरी करत असतानाही पूर्ण वेळ शिक्षण घेत असल्याचे या शिक्षिकेने दाखवले. इतकेच नाही तर या विद्यार्थिनीने परीक्षाही दिली नाही. विद्यापीठाची शिक्षणशास्त्र पदवीची परीक्षा गेल्या वर्षी २३ ते २८ मे २०१८ यादरम्यान होती. याच कालावधीत म्हणजे २१ ते २७ मे दरम्यान ही विद्यार्थिनी काश्मीर येथे सहलीला गेली असल्याचे उघड झाले. मात्र तरीही परीक्षेला मात्र या विद्यार्थिनी हजेरीही लागली आणि ती ब श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचा निकालही आला. विद्यापीठाने पदवीप्रमाणपत्र खरे असल्याची पडताळणीही केली. या प्रकाराबाबत पोलिसांकडेही तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची आणि महाविद्यालयाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी अधिसभेत दिले. गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या गैरप्रकारांवरून परीक्षा विभागाचा कारभार रुळावर आला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दुसरीकडे प्राध्यापक मूल्यांकनाच्या कामाला टाळाटाळ करत असल्याने विद्यापीठाचे निकाल रखडत आहेत. गेल्या वर्षी (मार्च २०१८) बाराशे प्राध्यापकांनी १० किंवा त्यापेक्षाही कमी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन केले होते. दुसरीकडे एका प्राध्यापकाना पाच हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासण्याची वेळ येत आहे. २९ प्राध्यापकांना पाच हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासल्या होत्या. तर काही प्राध्यापकांनी तर १५ हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले आहे. हे कमी म्हणून की काय विद्यापीठातील परीक्षांचे मूल्यमापन काही महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी करत असल्याचा आरोप मिलिंद साटम यांनी केला.

निकालाची चौकशी होणार

एका राजकीय नेत्याच्या सचिवाच्या पुनर्मूल्यांकनाच्या निकाल एका दिवसात जाहीर झाल्याचे समोर आले होते. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचप्रमाणे मूळ निकाल आणि पुनम्र्यूल्यांकनाचा निकाल यामध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक फरक पडला आहे. या विद्यार्थ्यांच्या निकालाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी युवासेनेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी केली. सुप्रिया कारंडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मांडलेल्या स्थगन प्रस्तावबाबत झालेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ‘नियमानुसार विद्यार्थ्यांचा निकाल वाढल्यानंतर त्याचे नियामकांकडून मूल्यांकन होणे गरजेचे होते. या प्रकाराची चौकशी करण्यात येईल,’ असे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.