राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश पात्र ठरविण्याकरिता बारावीच्या भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयगटाच्या गुणांची अट ४५ वरून ५० टक्के केल्याने यंदा तब्बल ८८०९ विद्यार्थी प्रवेशाकरिता अपात्र ठरले आहेत.
अभियांत्रिकी प्रवेशाकरिता सामाईक प्रवेश परीक्षेबरोबरच (सीईटी) बारावीत भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या विषयगटात काही किमान गुण असणे बंधनकारक आहे. राज्यामध्ये आतापर्यंत ही अट खुल्या गटाकरिता ४५ टक्के गुण तर राखीव प्रवर्गाकरिता ४० टक्के गुण अशी होती. परंतु, ऑक्टोबर, २०१२ मध्ये राज्य सरकारने गुणांची ही अट वाढवून अनुक्रमे ५० आणि ४५ अशी केली. या अटीचा फटका यंदा ८८०९ विद्यार्थ्यांना बसला आहे. यापैकी दोघा विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या या अटीला उच्च न्यायालयात आव्हानही दिले आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या (एआयसीटीई) निकषांनुसार ही अट अनुक्रमे ४५ आणि ४० टक्के गुण अशी आहे. परंतु, राज्य सरकारने गुणांची अट वाढविल्याने शेकडो विद्यार्थी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतून वगळले जाणार आहेत. एआयसीटीईच्या नियमाप्रमाणे गुणांची ही किमान अट आहे. राज्य सरकार गुणांची ही अट वाढवूही शकते. त्याप्रमाणे सरकारने ही अट वाढविली आहे.