सहा महिन्यांचे सीसीटीव्ही चित्रण तपासून कारवाई; ९० दुचाकी जप्त, १५० तरुण अटकेत

मुंबई : जीवघेण्या ‘बाइक रेसिंग’, ‘स्टंट’ना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलीस सरसावले असून अशा शर्यत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये अशा स्पर्धांमध्ये सहभागी तरुणांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चित्रणावरून शोध घेण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत चार दिवसांत वांद्रे रेक्लमेशन, माहीम कॉजवे, वांद्रे-कुर्ला संकुल, पश्चिम द्रुतगती मार्ग आदी ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी ९० दुचाकी जप्त केल्या. या दुचाकींवर शर्यत, वेडीवाकडे, जीवघेणे स्टंट करणाऱ्या सुमारे दीडशे तरुणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हा जामीनपात्र असल्याने तरुणांची जामिनावर सुटका झाली. मात्र प्रत्येकाच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्या अपरोक्ष मुले दुचाकीचा वापर कशासाठी, कसा करत आहेत याची जाणीव पोलीस करून देत आहेत. अशा स्पर्धांमध्ये याआधी घडलेले अपघात, त्यात झालेले मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आलेल्या तरुणांची उदाहरणे देत मुलांवर लक्ष ठेवण्याची हमी पालकांकडून घेण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत रात्री सुरू होणाऱ्या दुचाकी स्पर्धा, स्टंटबाजीबाबतच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे आल्या होत्या. स्पर्धा, स्टंट करणाऱ्या तरुणांमुळे इतरांच्या जिवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवघेणे प्रकार करणाऱ्या तरुणांच्या पालकांना त्याची माहिती व्हावी या उद्देशाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत अन्य ठिकाणी नाकाबंदी वाढवून मोहीम तीव्र करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (वाहतूक) नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.

प्रत्यक्ष धरपकडीस आता सुरुवात झाली असली तरी मागील सहा महिन्यांत अशा स्पर्धा, स्टंटबाजीत सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांचा शोध घेण्यात येत आहे. अशा स्पर्धा होत असलेले रस्ते आणि ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील गेल्या सहा महिन्यांचे चित्रण तपासण्यात येत आहे. चित्रणात असे प्रसंग आढळल्यास दुचाकीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे संबंधित तरुणांचा शोध घेण्यात येणार असून दुचाकी जप्त करून संबंधिताला अटक करण्यात येईल, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

शर्यत, स्टंट होणारी ठिकाणे

पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्ग, वांद्रे-कु र्ला संकु ल, वांद्रे रेक्लमेशन, सागरी सेतू, गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंट, पूर्व मुक्त मार्ग, पाम बीच मार्ग येथे बाइक रेसिंग, स्टंटबाजी होत असते.

स्पोर्ट्स बाइक जप्त

या कारवाईदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींमध्ये विविध कंपन्यांच्या महागड्या स्पोर्ट्स बाइकचा समावेश आहे. याशिवाय काही दुचाकींमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वेगासाठी अतिरिक्त यंत्र बसविल्याचे आढळले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दुचाकी जप्तच

या कारवाईत अटक केलेल्या तरुणांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या दुचाकी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या न्यायालयातून सोडवून घ्या, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. त्यामुळे दुचाकी सोडवून घेण्यासाठी तरुणांना न्यायालयात जावे लागेल. न्यायालयाच्या आदेशावर दुचाकींचे भवितव्य अवलंबून असेल.