संदीप आचार्य

मुंबई: नाना पाटील ( नाव बदलून) यांना सकाळीच अस्वस्थ वाटू लागले. छातीत कळ येऊन गेली. ७३ वर्षाच्या नानांना मधुमेह व उच्चरक्तदाबाचाही त्रास होता. घरच्यांनी तातडीने एका मोठ्या रुग्णालयात नेले मात्र तेथे जागा नसल्याचे कारण देत दाखल करून घेतले नाही. अशीच नकारघंटा आणखी दोन पंचतारांकित रुग्णालयात मिळाल्यानंतर रुग्णवाहिका सरळ पालिकेच्या शीव रुग्णालयात आली. तेथे  हृदयविकार विभागाच्या डॉक्टरांनी तातडीने तपासून दाखल करून घेतले एवढेच नव्हे तर रात्रीत यशस्वी अँजिओप्लास्टी केली. नानांची प्रकृती आता उत्तम असून आणखी दोन दिवसांनी त्यांना घरी सोडणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले…

महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या ६७ वर्षाच्या रामभाऊंनाही हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घरच्यांनी आधी मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न केले. मात्र कोणीच दाखल न केल्याने अखेर त्यांनी शीव रुग्णालय गाठले. तेथे हृदयविकार विभागात रामभाऊंना दाखल करून त्यांच्यावरही यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. “करोनाच्या गेल्या दोन महिन्यात शीव रुग्णालयातील हृदयविकार विभागात अशा जवळपास १९० रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यात ६० हून अधिक रुग्णांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत” असे या विभागातील प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांनी सांगितले. “या १९० रुग्णांमध्ये साठ वर्षांवरील २५ रुग्ण असून उपचारानंतर आता या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे व यातील बहुतेकांना घरी सोडण्यात आले आहे ” असेही डॉ. अजय महाजन यांनी सांगितले.

करोनाच्या लढाईत महापालिकेची शीव, नायर व केईएम मोठी झुंज देत आहेत. शेकडो करोना रुग्णांवर जीवाची बाजी लावून पालिकेचे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी उपचारांची शिकस्त करत आहेत. करोनाच्या लढाईत या तिन्ही रुग्णालयातील शेकडो डॉक्टर व परिचारिकांना क्वारंटाइन व्हावे लागले आहे. एकट्या शीव रुग्णालयात शंभरहून अधिक डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांवर क्वारंटाइन होण्याची वेळ आल्याचे येथील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. “तथापि आमच्या डॉक्टरांनी रुग्णसेवेचे व्रत अखंड सुरु ठेवले आहे” असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. आमच्या सर्वच विभागातील डॉक्टरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे सांगून अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, “खासगी रुग्णालये नाकारत असलेल्या हृदयविकाराच्या रुग्णांवर शीव रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे.”

“शीव रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात एकूण २८ खाटा आहेत तर अतिदक्षता विभागात १४ खाटा आहेत. करोनाच्या काळातही बाह्यरुग्ण विभागात रोज २५ ते ३० रुग्ण उपचारासाठी येत असून एरवीच्या तुलनेत हे प्रमाण नक्कीच कमी आहे. गेल्या दोन महिन्यात आमच्या विभागात १९० रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच पेसमेकर बसविण्यापासून विविध हृदयोपचार करण्यात आले आहेत” असे डॉ. अजय महाजन म्हणाले.

आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांची करोना चाचणी केली जाते मात्र प्रथम आम्ही रुग्णावर उपचार करतो. येणारा प्रत्येक रुग्ण हा संशयित करोना रुग्ण म्हणूनच पाहिला जातो. महत्वाचे म्हणजे हृदयविकाराच्या सर्व प्रक्रिया आम्ही करोनाचा पोषाख घालूनच करतो, असेही डॉ. महाजन म्हणाले. हृदयविकार शस्त्रक्रिया करताना अॅनॅस्थेशियाच्या डॉ. शकुंतला, आमचे विभागप्रमुख डॉ नाथानी, डॉ. नवीन, डॉ. मिलिंद फडके, डॉ. अभय तिडके तसेच ह्रदयशल्यचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयंत खांडेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही डॉ. महाजन म्हणाले. करोनाच्या काळातही २५ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांवर आम्ही यशस्वी अँजिओप्लास्टी करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे, असेही डॉ. अजय महाजन म्हणाले.

“शीव रुग्णालयातील हृदयविकार विभागात गेली अनेक वर्षे गुंतागुंतीच्या व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत. करोनाच्या काळातही येथील सर्व डॉक्टर हृदयविकाराच्या शेकडो रुग्णांवर उपचार करत असून खासगी रुग्णालयात उपचार नाकारले जात असले तरी शीव रुग्णालयात तुम्हाला सर्वोत्तम उपचार मिळतील याची खात्री बाळगा”, असे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. रुग्णसेवा हेच आमचे व्रत आहे आणि तेच आमचे ब्रीद असल्याचेही डॉ. भारमल म्हणाले.