News Flash

सुधींद्र कुलकर्णींवर ऑईलपेंट फेकण्यात आल्याचे तपासणीत स्पष्ट

सुधींद्र कुलकर्णी यांनी या शाईफेकीसाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे

मुंबई पोलिसांनी कुलकर्णी यांच्यावरील शाईफेकप्रकरणी पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. (छाया - गणेश शिर्सेकर)

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाविरोधातील आंदोलनावर शिवसेना अजूनही ठाम असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. ते सोमवारी शिवसेना भवनात बोलत होते. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा हस्तक्षेप करून थांबववा अशी मागणीही केली. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे शिवसेनेचा कार्यक्रमाला असणारा विरोध मावळला, अशा बातम्या सकाळापासून जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहेत. मात्र, त्या खोट्या असून शिवसेना अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे राऊत यांनी सांगितले.  तत्पूर्वी सुधींद्र कुलकर्णी यांना  तपासणीसाठी जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या तोंडावर फेकण्यात आलेला पदार्थ काळी शाई नसून ऑईलपेंट रंग असल्याचे स्पष्ट झाले.

सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर सोमवारी मुंबईत करण्यात आलेल्या शाईफेकीचे समर्थन करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी कुलकर्णी यांच्यावर पाकिस्तानची एजंटगिरी करत असल्याचा आरोप केला. पाकिस्तानची चमचेगिरी करणाऱ्या सुधींद्र कुलकर्णींना काळ फासलं हा जनतेचा सनदशीर मार्गच आहे. ही शाईफेक शिवसैनिकांनी केली असा आरोप कुलकर्णी करत असतील, तर त्यांनी तो करो. मुळात बाळासाहेबांनी अशीच हिंमतीची आणि मर्दमुकीची कामे करण्यासाठी शिवसेना जन्माला घातली होती. त्यामुळे शिवसेना ही शिवसेनेसारखीच वागणार, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. राज्यातील भाजप नेत्यांच्या मनातदेखील याबाबत वेगळी भावना आहे. मात्र, सत्तेत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह या नेत्यांना त्यांच्या भावना उघडपणे व्यक्त करता येत नसल्याचेही यावेळी राऊत यांनी म्हटले. दरम्यान, शाईफेकीच्या घटनेनंतर सुधींद्र कुलकर्णी यांनीदेखील आजचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच होणार, असे सांगत शिवसेनेला आव्हान दिले आहे. त्यामुळे वरळीच्या नेहरू तारांगण प्रांगणातील कार्यक्रमस्थळाच्या  परिसरात  पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी कुलकर्णी यांच्यावरील शाईफेकप्रकरणी पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर सोमवारी सकाळी त्यांच्या सायन येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात व्यक्तींनी शाईफेक केली. खुर्शिद यांच्या ‘नायदर ए हॉक नॉर ए डोव्ह : अ‍ॅन इनसाइडर्स अकाऊंट ऑफ पाकिस्तान्स फॉरेन पॉलिसी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी संध्याकाळी मुंबईत पार पडणार आहे. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. विशेष म्हणजे राज्य सरकारने या कार्यक्रमाला सर्वतोपरी सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे या वादाला भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाची किनारही प्राप्त झाली होती.

या कार्यक्रमाला गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून प्रखर विरोध करण्यात येत होता. शिवसेनेने हा कार्यक्रम उधळून टाकण्याचा इशाराही दिला होता. शिवसेनेने या कार्यक्रमाला असणारा विरोध मागे घ्यावा, यासाठी काल सुधींद्र कुलकर्णी यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती. मात्र, ही भेट निष्फळ ठरली होती. त्यानंतर कुलकर्णींनी हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच पार पडणार, असे पत्रकारांना सांगितले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्यावेळी शिवसैनिकांकडून विरोध होणे अपेक्षित होते.

 

ई-एडिट : शिव-शाईचा स्वार्थवाद!

शिवसेना आणि भाजपमधील भांडण विकोपाला गेले आहेत आणि लवकरच त्यांचातील युतीचा घटस्फोट होईल. शिवसेनेला पाकिस्तानविरोधात इतकी कठोर भूमिका घ्यायचीत होती तर, पंतप्रधानांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे नवाज शरीफ यांच्या बाजूला का बसले?, उद्धव ठाकरेंनी तेव्हाच शरीफ यांचा समोरासमोर निषेध का केला नाही?. सरकारच्या भूमिकेला शिवसेनेचा इतकाच विरोध आहे तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. सेनेने सत्तेत राहून विरोध करण्याची दुटप्पी भूमिका सोडली पाहिजे. शिवसेना खरचं बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे.
राजीव सातव, काँग्रेस 

शिवसेनेचा इतिहास पाहता अशाप्रकारचा आक्रमकपणा नवीन गोष्ट नाही. भाजप आणि शिवसेना हिंदुत्त्वाच्या समान मुद्द्यावर निवडणूक लढवतात. त्यामुळे कट्टर हिंदुत्त्ववादी कोण हे दाखविण्यासाठी सध्या शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्यातूनच आज मुंबईत सुधींद्र कुलकर्णींवरील हल्ल्याचा हा प्रकार घडला. या माध्यमातून आम्ही कट्टर हिंदूत्त्ववादी आहोत, हे लोकांमध्ये ठसविण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे.
जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी अशाप्रकारे हल्ला करणे निषेधार्ह आहे. ही महाराष्ट्राची आणि देशाचीही संस्कृती नाही. उद्या तुम्ही सानिया मिर्झालाही विरोध कराल. शिवसेनेला नेमका कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर विरोध करायचा आहे, हे त्यांनी सर्वप्रथम ठरवले पाहिजे.
अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 10:09 am

Web Title: sudheendra kulkarni allegedly attacked by sena activists ahead of kasuri book launch
टॅग : Sudheendra Kulkarni
Next Stories
1 शिवसेनेच्या विरोधानंतरही कार्यक्रम होणारच – सुधींद्र कुलकर्णी
2 भाडेकरू हस्तांतरणावर पालिकेचे सूचना पाठविण्याचे आवाहन
3 वादळ शमले, ढगाळ वातावरण कायम..