शिवसेनेचे नाराज आमदार भास्कर जाधव यांनी आज अधिवेशना दरम्यान अत्यंत पोटतिडकीने भाषण करत कोकणाचे प्रश्न उपस्थित केले. ते खाली बसताच सुधीर मुनगंटीवर उभे राहिले आणि त्यांनी कोकणातले प्रश्न पोटतिडकीने मांडल्याबद्दल भास्कर जाधव यांचं अभिनंदन केलं. इतकंच नाही तर त्यांना एक ऑफरही देऊन टाकली. “भास्कर जाधव तुम्ही अत्यंत छान बोललात, तुमच्या नावात म्हणजेच भास्कर जाधव या नावात भास्करचा B आणि जाधवचा J आहेच त्याला आता प्रगतीचा P जोडा आणि BJP मध्ये या अशी ऑफरच सुधीर मुनगंटीवार यांनी भास्कर जाधव यांना दिली. त्यांनी ही ऑफर देताच सभागृहात एकच हशा पिकला.

नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?
“भास्कर जाधव यांनी कोकणाच्या विकासाबाबत त्यांना काय वाटतं याबाबत अतिशय पोटतिडकीने भूमिका मांडली. कोकणचा विकास करण्यासाठी त्यांनी साडेचार हजार कोटींची मागणी केली आहे. मात्र त्यांचं बोलणं ऐकून ते गांभीर्यानं घेणारी मंडळी इथे दिसत नाहीत. मत्स्य संवर्धनासाठी त्यांनी दीड हजार कोटी मागितले, पर्यटनासाठी दीड हजार कोटी मागितले. कोकणच्या विकासासाठी एकूण साडेचार हजार कोटींचा निधी मागितला. अशावेळी इथे अर्थमंत्री असणं गरजेचं आहे. मात्र अर्थमंत्री सभागृहात हजर नाहीत. इथे तुम्ही जे बोलत आहात त्याचं गांभीर्य कुणाला नाही. या मुद्द्यावर मतदान होणार नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला साथ देऊ शकत नाही. भास्कर जाधव या तुमच्या नावात B आणि J ही दोन अक्षरं आहेतच. आता प्रगतीचा P घ्या आणि BJP मध्ये या” अशी ऑफरच सुधीर मुनगंटीवार यांनी भास्कर जाधव यांना दिली.

भास्कर जाधव हे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आले. त्यांना शिवसेनेत आल्यावर मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना कोणतंही पद देण्यात आलं नाही. त्यामुळे ते नाराज झाले. त्यांची ही नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यातही लख्खपणे दिसली. आता भाजपाने त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. ही ऑफर ते स्वीकारणार का? की एक हलकाफुलका विनोद म्हणून ही ऑफर विसरुन जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.