आपल्यावर अन्याय झाला किंवा आपली एखादी मागणी पूर्ण करुन घेण्यासाठी उंच ठिकाणी जाऊन ‘शोले स्टाइल’ आत्महत्येची धमकी देण्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. काल दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईमध्येही असाच एक प्रकार घडला. मात्र अचानक मनपरिवर्तन झाल्याने उडी मारल्याच्या पुढच्या क्षणी आत्महत्येचा निर्णय मागे घेणारा तरुण १४ मजल्यावरील क्रेनला लटकला. हाताने क्रेन घट्ट पकडून ठेवत वेळीच स्वत:ला सावरून या तरुणाने स्वत:चा जीव अगदी थोडक्यात वाचला.

अंधेरी पूर्वेतील सहार रोड येथे एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. याच ठिकाणी हा फिल्मी ड्रामा काल दुपारच्या वेळेस रंगला. काल दुपारी दसऱ्यानिमित्त सर्व कामगारांना सुट्टी देण्यात आली होती तरी मूळचा झारखंडचा असणारा, याच बांधकामाच्या ठिकाणी काम करणारा हा तरुण क्रेनवर चढला. या २५ वर्षीय तरुणावर सहकारी कामगारांने पैसे चोरीचा आळ घेतल्याने निराशेमधून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. काही कामगारांना हा तरुण काल दुपारी साडेतीनच्या सुमारात १४ मजल्यावरील क्रेनच्या टोकावर उभा असलेला दिसला त्यावेळी एकच गोंधळ उडाला. लगेचच तेथील कंत्राटदाराने पोलिसांना आणि अग्निशामक दलाला फोन करुन याबद्दलची माहिती दिली.

हा तरुण क्रेनवर जवळ जवळ ४५ मिनिटे उडी मारण्याची धमकी देत उभा होता. खाली जमलेल्या सर्व लोक त्याला उडी न मारण्याची विनंती करत होते. मात्र त्या मुलाने उडी मारली आणि पुढच्या क्षणी आपला निर्णय बदलत क्रेनला घट्ट पकडले. शेवटच्या क्षणी क्रेनचा काही भाग हाताने घट्ट पकडता आल्याने तो खाली न पडता लटकून राहिला. हाताने क्रेन पकडून पाय हवते असलेल्या अर्धवट लटकलेल्या अवस्थेत तो क्रेनला काही काळ लटकून होता. त्यानंतर पाच मिनिटे कसरत करून बऱ्याच प्रयत्नांनंतर तो पुन्हा क्रेनवर चढला आणि तेथून पुन्हा बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमधून शिड्यांने खाली उतरला.

कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एका कामगाराचे पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर काही कामगारांमध्ये बाचाबाची झाली. या तरुणावर पैसे चोरीचा आरोप करण्यात आला. त्यामुळे रागावला हा तरुण आत्महत्या करण्यासाठी १४ मजल्यावर असणाऱ्या क्रेनवर चढला. या सर्व गोंधळानंतरही पैसे कोणी चोरले यासंदर्भात कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र आरोप झाल्याने संतापलेल्या तरुणाने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे कंत्राटदार म्हणाला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.