काहींचा ऑनलाइन शिबिरांकडे मोर्चा

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : करोनामुळे भीतीचे वातावरण पसरल्याने फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नसल्याने उन्हाळी सुटीतील साहस, निसर्ग आणि जंगलवाचन शिबिरे बहुतांश आयोजकांनी रद्द केली आहेत. तर काहींनी शिबिरांतील काही भाग ऑनलाइन माध्यमातून घेता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे.

उन्हाळी सुटय़ांमध्ये साहस, निसर्ग शिबिरांची मोठी धामधूम सुरू असते. या काळात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील अति उंचावरील गिरिभ्रमणाचे उपक्रमदेखील आखले जातात. पण टाळेबंदी उठली तरी अशा शिबिरांसाठी पूरक परिस्थिती असेलच याबाबत शंका असल्यामुळे अनेकांनी ही शिबिरे आणि गिरिभ्रमणाचे उपक्रम रद्दच केले आहेत. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर दऱ्याखोऱ्यातील गावांनी सध्या कडेकोट गावबंदी केली आहे. त्यामुळे टाळेबंदी संपली तरी विशेषत: हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथील गावकरी आरोग्य सुरक्षेच्या कारणास्तव असे उपक्रम आणि शिबिरांबाबत अनुत्सुक असल्याचे ज्येष्ठ गिर्यारोहक हृषीकेश यादव यांनी सांगितले. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने टाळेबंदीनंतरही शिबिरे अथवा गिरिभ्रमणाचे उपक्रम टाळावेत, अशी सूचना त्यांच्या सभासद संस्थांना केल्याचे महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितले.

निसर्गवाचन, जंगलवाचन शिबिरेदेखील रद्द केली जात असून, त्यापैकी काही संस्थांनी अशा शिबिरातील काही भाग हा ऑनलाइन पद्धतीने घेता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे. प्रत्यक्ष जंगलाचा अनुभव जरी देता आला नाही

तरी जंगल वाचनातील बहुतांश बाबी ऑनलाइन माध्यमातून समजावून सांगता येतील, असे स्प्राऊट या संस्थेचे आनंद पेंढारकर यांनी सांगितले. त्या अनुषंगाने सध्यादेखील काही उपक्रम संस्थेमार्फत केले जात असल्याचे ते म्हणाले.

युथ होस्टेलचे सर्व उपक्रम रद्द

युथ होस्टेलतर्फे उन्हाळ्यामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिउंचावरील गिरिभ्रमणाचे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. जून-जुलैपर्यंतचे हे सर्व उपक्रम रद्द केले असल्याचे युथ होस्टेलच्या साहसी उपक्रम समितीचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी सांगितले. रद्द केलेल्या उपक्रमांसाठी भरलेल्या शुल्क परत देण्याऐवजी डिसेंबर २०२१ पर्यंतच्या काळासाठी क्रेडिट व्हाऊचर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.