सुनील तटकरे यांचे भाकित; राष्ट्रवादीचा सरकारला पाठिंबा नाही

शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी सत्तेबाहेर पडण्याचे काहीच मत व्यक्त केलेले नाही. यावरून निवडणुकीपर्यंत शिवसेना सत्तेत कायम राहून निवडणुकीसाठी सारी ‘तयारी’ करणार हे स्पष्टच दिसते. शिवसेनेने अगदी पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी भाजप सरकारला पाठिंबा देणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

स्वबळावर लढण्याचे जाहीर करणाऱ्या शिवसेनेने सत्तेबाहेर पडण्याचे जाहीर केलेले नाही. यावरून शिवसेनेला सत्ता सोडवत नाही हे स्पष्टच होते. आधी मंत्र्यांचे राजीनामे खिशात घेऊन शिवसेना नेते फिरत होते. त्या राजीनाम्यांचे काय झाले हे शिवसेनेचे नेतेच जाणोत. आता मात्र सत्ता सोडणार नाही हे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने ‘कामे’ शिवसेनेच्या मंत्र्यांकडून पुढील काळात केली जातील. शिवसेनेची सत्तेबाहेर पडण्याची धमक दिसत नाही, असे तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला असला तरी सरकारला धोका नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असून, अदृश्य हात सरकारला मदत करतील, असेही सूचित केले. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास राष्ट्रवादी भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही तटकरे यांनी सांगितले. कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने निकालाच्या दिवशी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शविली होती. आता मात्र कसलीही मदत केली जाणार नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठवाडय़ाचा दौरा केला होता. आता तीन वर्षांनी हल्लाबोल आंदोलनासाठी मराठवाडा पालथा घातला असता नागरिकांमध्ये भाजपच्या विरोधात मोठय़ा प्रमाणावर नाराजी जाणवली. विशेषत: तरुण वर्गाचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाल्याचेही तटकरे यांनी सांगितले.