सर्वोच्च न्यायालयाचा निकालात सुधारणा करण्यास नकार
राष्ट्रीय स्तरावर १ मे आणि २४ जुलै रोजी होणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) याच सामाईक प्रवेश परीक्षेच्या आधारे देशभरातील सरकारी, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश होतील, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या निकालात सुधारणा करण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील नीटची टांगती तलवार कायम राहणार आहे. मात्र, ज्या ज्या राज्यांना नीटबाबत आक्षेप आहेत, त्यांची भूमिका आपण निश्चितपणे जाणून घेऊ, असेही न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट करत आशेचा किरण दाखविला आहे.
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या विविध राज्यांच्या वैद्यकीयच्या प्रवेश परीक्षा तोंडावर असतानाच नीटनुसारच प्रवेश करण्याचे बंधन न्यायालयाने घातल्याने देशभरात वैद्यकीय प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दोन दोन वर्षे ज्या परीक्षेच्या तयारीत घालवली त्याऐवजी अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत दुसऱ्याच परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थी पुरते गोंधळून गेले आहेत.
हा गोंधळ दूर व्हावा यासाठी न्यायालयाने दिलेल्या निकालात सुधारणा करत राज्यांना २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत तरी त्यांच्या त्यांच्या प्रवेश परीक्षा घेऊन त्यानुसार प्रवेश करण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाकडे शुक्रवारी केली. तसेच, १ मे रोजी होणारी नीट-१ म्हणजे ‘ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्ट’ (एआयपीएमटी) रद्द करून २४ जुलैला सर्व विद्यार्थ्यांकरिता एकच नीट घेण्यात यावी, अशीही त्यांची सूचना होती. कारण, १ मेच्या परीक्षेकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्यालाही २४ जुलैला परीक्षेला ‘नीट-२’ला बसू द्यावे, अशी मागणी सुरू केली आहे. त्यावर तातडीची सुनावणी घेण्याचे संकेतही न्यायालयाने सकाळच्या सत्रात दिले. मात्र, दुपारच्या सत्रात याप्रकरणी काहीही ऐकून घेण्यास न्यायालयाने नकार दिला. ज्या खंडपीठाने या संदर्भात निकाल दिला ते आज नसल्याने सुधारणा करता येणार नाही. तसेच, संबंधित राज्य सरकारांनी अर्ज केल्यानंतर आपण यावर विचार करू, असे न्या. ए. आर. दवे यांनी स्पष्ट केले आहे.

गुरुवारचा निकाल काय ?
वैद्यकीयकरिता १ मे रोजी ‘एआयपीएमटी’ या केंद्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेला धक्का न लावता ती नीट-१ म्हणून ओळखली जावी. तर ज्यांनी या परीक्षेकरिता अर्ज केलेले नाहीत त्यांच्याकरिता दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २४ जुलैला सीबीएसईने आणखी एका परीक्षेचे आयोजन करावे, असे न्यायालयाने गुरुवारच्या निकालात स्पष्ट केले होते. ही नीट-२ म्हणून ओळखली जाणार आहे.