अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा अमली पदार्थाच्या अनुषंगाने तपास करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) न्यायालयात शुक्रवारी ६० हजारांहून अधिक पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

मुंबईत १९९३ मध्ये घडवण्यात आलेल्या स्फोटांशी संबंधित १८९ आरोपींविरोधात आरोपपत्रे दाखल करण्यात आली होती. तीही दहा हजार पानांची होती. या साखळी बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता. ७ जुलै २००६  रोजी उपनगरीय लोकलमध्ये घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटसंबंधित खटल्यात १३ आरोपींविरोधात १० हजार ६६७ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या साखळी बॉम्बस्फोटात २०९ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्लय़ाशी संबंधित खटल्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबविरोधात पोलिसांनी ११ हजार ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या हल्ल्यात १७४ लोकांचा मृत्यू झाला होता.   एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, अनुज केशवानी, आझम जुम्मन, क्षितिज प्रकाश, संकेत पटेल, परमजित आनंद यांच्यासह ३३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्रात आरोपींकडून हस्तगत केलेले अमली पदार्थ, व्हॉट्सअप संवाद, बँक व्यवहारांची माहिती, तसेच आरोपी आणि २०० साक्षीदारांचे जबाब आदींचा समावेश आहे, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.  गेल्या वर्षी जून महिन्यात अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या घरात आढळला होता.

किती मोठे?

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने या प्रकरणात १२ हजार पानांचे मुख्य, तर ५० हजारांहून अधिक पानांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातील दोषारोपपत्राचा समावेश केला.  एवढय़ा मोठय़ा स्वरूपात हे बहुधा पहिलेच आरोपपत्र आहे. मुंबईत १९९३ मध्ये घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यात १० हजार पानांचे प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

आठ जण अद्याप कोठडीत.. रिजेल महाकाल, आझम जुम्मन, ऋषिकेश पवार, जगतापसिंह आनंद, राहिला फर्निचरवाला असे आठ जण अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यांची चौकशी..

अर्जुन रामपाल याच्या मैत्रिणीचा भाऊ अगिसिलोस डेमेट्रियड्स, झैद विलात्रा, राहिल विश्राम, रिजेल महाकाल, ऋषिकेश पवार, जगतापसिंह आनंद, करणजीत आनंद आणि राहिला फर्निचरवाला यांचाही दोषारोपपत्रात समावेश केला आहे, तर अर्जुन रामपालची बहीण कोमल हिची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.