अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) कारवाईला सुरुवात केली आहे. एनसीबीने सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने सकाळी सॅम्यूअल मिरांडाच्या घरावर धाड टाकली होती. जवळपास अडीच तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. दुसरीकडे एनसीबीकडून रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावरही धाड टाकण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एनसीबीकडून सकाळी सॅम्यूअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीच्या घरावर धाड टाकण्यात आली. एनसीबीची टीम सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली होती.

आणखी वाचा- रिया चक्रवर्तीच्या घरावर एनसीबीचा छापा, मुंबई पोलिसांसोबत झाडाझडती सुरु

एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसंच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा- शोविक चक्रवर्तीचे अमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध स्पष्ट

आणखी वाचा- एनसीबीची मोठी कारवाई, रिया चक्रवर्तीच्या भावाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी बुधवारी एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला होता.