अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तिची आणि तिच्या कुटुंबीयांची ईडी चौकशी करत आहे. या चौकशीमध्ये अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. या चौकशीमध्ये सुशांतच्या खात्यातून रियाच्या खात्यात कोणत्याही प्रकारची मोठी रक्कम ट्रान्सफर झाली नव्हती असं ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. गेल्या एका वर्षामध्ये सुशांतच्या खात्यातून रिया किंवा तिच्या कुटुंबीयांच्या खात्यात कोणतीच रक्कम जमा झालेली नाही. परंतु, सुशांतच्या खात्यातून ५५ लाख रुपये काढण्यात आले आहेत, त्यामुळे सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे.

सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीविरोधात अनेक आरोप केले असून ईडीने दोन वेळा रियाची चौकशी केली. जवळपास १८ तास झालेल्या या चौकशीमध्ये सुशांतच्या खात्यातून रियाच्या खात्यात थेट कोणतीच रक्कम ट्रान्सफर झाली नव्हती. परंतु, कोटक बँकेत असलेल्या सुशांतच्या खात्यातून ५५ लाख रुपयांची रक्कमेचं ट्रान्जेक्शन झालं असून त्याचा तपास सुरु आहे.

२०१९ पर्यंत सुशांतच्या खात्यात १५ कोटी रुपये होते. हे पैसे कर आणि प्रवास खर्च यांच्यासाठी खर्च झाले होते. तसंच अन्यही काही गोष्टी होत्या, ज्यात हे पैसे खर्च करण्यात आले होते.  मात्र त्यातील ५५ लाख रुपये नेमके कशासाठी खर्च झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, रियाच्या झालेल्या चौकशीमध्ये तिचं आणि सुशांतचं कोणतंच जॉइंट अकाऊंट नसल्याचं समोर आलं आहे. तसंच सध्या ईडी रिया आणि तिच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करत आहेत. यामध्ये सुशांतच्या ‘फ्रण्ट इंडिया फॉर वर्ल्ड फाऊंडेशन’ आणि ‘Vividrage Rhealityx Private Limited’ या कंपन्यांच्या डारेक्टरपदी रिया आणि तिच्या भावाची शोविकची निवड झाले होती असं सांगण्यात येत आहे.