रेसकोर्सवर उद्यान बनविण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे म्हणणे असल्यामुळेच त्यांना भेटण्याचा प्रश्न येत नाही. या जागेवर दर्जेदार उद्यान बनविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हवे तर त्याचे श्रय घ्यावे, मात्र मुंबईकरांना जागतिक दर्जाचे उद्यान मिळालेच पाहिजे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मांडली.
रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकल्पना उद्यान (थीम पार्क) करण्याची कल्पना माझीच असून त्याला लोकांना पाठिंबा मिळत आहे. मला याप्रकरणी राजकारण करणाऱ्या कोणावरच टीका करायची नसून सर्वच राजकीय पक्षांनी या योजनेला पाठिंबा द्यावा, एवढेच माझे म्हणणे आहे, असे एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी सांगितले.
रेसकोर्सचे लीज ९९ वर्षांनंतर संपले असून हा एक चांगला योग आहे. त्याला वक्री शनीने ग्रासू नये, अशी अपेक्षाही त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली. आपण थीम पार्कसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली असून मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून त्यांचा पाठिंबा घेणार का, याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले.
महापालिकेने भाडेपट्टीने विविध संस्था तसेच खाजगी कंपन्यांना दिलेल्या जागांच्या भाडेकराराची मुदत संपुष्टात आली आहे. अशा २२१ जागा असून त्याबाबत पालिकेत सत्तेवर असलेली शिवसेना निर्णय का घेत नाही, असा प्रश्नाला उत्तर देताना ती प्रशासनाची जबाबदारी असून त्यांनी निर्णय घ्यावा असे उद्धव म्हणाले.
‘सर्वसामान्य मुंबईकर एखादा दिवस आनंदात घालवतील असे मुंबईतील एखादे तरी ठिकाण दाखवा’ असे आव्हान उद्धव यांनी केले.

रेसकोर्सचा निर्णय घेणारे उद्धव कोण-राणे
रसकोर्सची बहुतेक जागा ही राज्य शासनाच्या मालकीची असताना रेसकोर्सवर थीम पार्क उभारणारे उद्धव ठाकरे कोण, असा सवाल राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. महापालिकेच्या उद्याने व मैदानांचा विकास न करता राज्य शासनाच्या जागेचा निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव यांना कोणी दिले, असाही टोला नारायण राणे यांनी लगावला. अनेक वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेने मुंबईकर आपला दिवस आनंदात घालवतील असे ठिकाण का तयार करू शकले नाही, असा सवालही त्यांनी केला.