भारतातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ओळखल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची दुसरी चाचणी यशस्वीरित्या पार पडली. दिल्ली ते मुंबई हे सुमारे 1,388 किलोमीटरचे अंतर टॅल्गो ट्रेनने १२ तासांपेक्षा कमी वेळेत गाठले आहे. राजधानी एक्सप्रेस हेच अंतर गाठण्यासाठी १६ तास घेत असून टॅल्गो ट्रेनची चाचणी यशस्वी झाल्याने रेल्वेच्या सेमी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला चालना मिळाली आहे.
दिल्ली मुंबई मार्गावर शनिवारी टॅल्गो ट्रेनची चाचणी घेण्यात आली. दिल्लीवरुन दुपारी पावणे तीनला निघालेली टॅल्गो ट्रेन मुंबईत रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास दाखल झाली आणि रेल्वेच्या अधिका-यांनी सुटकेचा श्वास घेतला. टॅल्गो ट्रेनच्या चाचणी विषयी माहिती देताना रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चर विभागाचे संचालक विजय कुमार म्हणाले, टॅल्गो ट्रेनने दिल्ली – मुंबई हे अंतर ११ तास ४८ मिनीटांमध्ये पूर्ण केले. यात ६ मिनिटांचा वेळ अचानक आलेल्या अडचणींमुळे वाया गेला असे त्यांनी सांगितले. म्हणजेच टॅल्गो ट्रेनने ११ तास ४४ मिनिटांमध्ये दिल्लीवरुन मुंबई गाठली असे त्यांनी सांगितले. या चाचणीमध्ये टॅल्गो ट्रेनचा वेग प्रति तास १५० किमी ऐवढा होता. कमी वजनाचे डब्यांमुळे टॅल्गो ट्रेनला १५० किमीचा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. टॅल्गो ट्रेनच्या डब्यांची मेपासून चाचपणी सुरु आहे. वारंवार झालेल्या तपासण्यांनंतर टॅल्गो ट्रेनला भारतीय रुळांवरील परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश आले आहे.
दिल्ली – मुंबईपूर्वी मथुरा – पलवाल या मार्गावर टॅल्गो ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. टॅल्गो ट्रेन ही स्पेन बनावटीची आहेत. चाळीसच्या दशकात स्थापन झालेल्या या कंपनीने आता मध्य आशिया, अमेरिकेनंतर भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. ३० टक्के वीजेचा कमी वापर, हलके कोच आणि वळणावर वेग कमी करण्याची गरज नसलेले टॅल्गो २५० कोच भारतीय रुळांवर वापरले जाणार आहेत. भारतीय इंजिनला जोडून सध्या टॅल्गो ट्रेनची चाचणी सुरु आहे. टॅल्गो ट्रेनमध्ये दोन एक्झिक्युटिव्ह आणि चार चेअर कारचे कोच आहेत. याशिवाय खानपान व्यवस्थेसाठी स्वतंत्र कॅफेटेरियाचा कोचदेखील ट्रेनमध्ये असेल. तसेच पॉवर कोचही या ट्रेनला जोडलेला असेल. राजधानीच्या तुलनेत सध्या टॅल्गो ट्रेनची प्रवासी क्षमता कमी आहे. पण प्रवास आरामदायी असल्याने टॅल्गो ट्रेनला भारतात चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास कंपनीचे अधिकारी व्यक्त करत आहेत. टॅल्गो ट्रेन भारतात धावण्यासाठी नवीन रुळांची गरज नाही. मात्र अन्य पायाभूत सुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. चाचणीचा निकाल जाहीर झाल्यावर टॅल्गो ट्रेनसाठी आवश्यक असलेले बदल केले जातील असे अधिका-यांनी सांगितले.