इंद्रायणी नार्वेकर

खड्डे पडले की डांबरमिश्रित खडी ओतायची आणि सपाटीकरण करायचे, या वर्षांनुवर्षे राबवलेल्या तंत्रामुळे पुलांवर वाढलेला भार कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने आता पावले उचलली आहेत. मुंबई शहरातील १७ पुलांचे पृष्ठभाग खरवडून त्यावरील डांबराचे थर हटवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबई आयआयटीच्या शिफारशीनुसार पालिका हे काम करत असून त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने (आयआयटी) रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या पुलांचा भार कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने पुलांवर चढविलेल्या डांबरांच्या थरांमुळे पुलावरील भार वाढतो आहे. त्यामुळे पूल कमकुवत होत असल्याचे आयआयटीने पालिकेला कळवले आहे. आयआयटीच्या सूचनेनुसार हे सगळे थर पालिका काढून टाकणार आहे. या पुलावरील सुमारे ३० ते ४० सेंमीचे डांबराचे थर जमा झाले आहेत. प्रत्येक पुलावरील थराची उंची वेगवेगळी आहे. हे थर काढून त्यावर आता मास्टिक अस्फाल्टचे थर लावण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अंधेरीच्या पुलाची दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेवरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विविध कंपन्यांच्या उपयोगिता वाहिन्यांच्या भारामुळे पुलाचा भाग पडल्याचे त्या वेळी आढळून आले होते. रेल्वे आणि आयआयटीने रेल्वेवरील पुलांची संरचनात्मक तपासणी केल्यानंतर अनेक पुलांवर अनावश्यक भार (डेड लोड) वाढत असल्याचे आढळून आले होते. हा भार कमी करण्याच्या सूचना आयआयटीने पालिकेला दिल्या आहेत. या पुलांवर जुन्या जलवाहिन्या, विजेच्या वाहिन्या तसेच अन्य उपयोगिता वाहिन्यांचा प्रचंड भार आहे. यापैकी वापरात नसलेल्या वाहिन्या काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वॉर्डाना सूचना देऊन हा भार कमी करण्याचे आदेश देण्यात आले होते. एफ दक्षिण विभागाने त्यानुसार चिंचपोकळी व करी रोड पुलावरील या जुन्या वाहिन्या काढून टाकल्या आहेत. आता आयआयटीने शहर भागातील जुन्या पुलांवरील अधिकचे थर काढून टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. .

पैशांचा अपव्यय

या सर्व पुलांच्या दुरुस्तीसाठी ते गुळगुळीत करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. मात्र हे थर चढवताना शास्त्रशुद्ध पद्धतीने काम न केल्यामुळे वर्षांनुवर्षे या थरांची उंची वाढतच चालली आहे. त्यामुळे हे थर काढण्यासाठी आता पालिकेला कोटय़वधी खर्च करावे लागणार आहेत. हे १७ पूल खरवडण्यासाठी १२ कोटींचा  अंदाजित खर्च आहे. या पुलांवर वेळोवेळी डांबरांचे, कधी पेव्हर ब्लॉकचे थर चढवण्यात आले आहेत.

हे पूल खरवडणार

महालक्ष्मी, प्रभादेवी स्थानकावरील कॅरोल पूल, दादर स्थानकावरील टिळक पूल, चिंचपोकळी स्थानकावरील पूल, करी रोड स्थानकावरील पूल, वडाळा स्थानकावरील नाना फडणवीस पूल, जीटीबी स्थानकावरील पूल, माटुंगा स्थानकावरील टी. एच. कटारीया पूल, मुंबई सेंट्रल येथील बेलासीस पूल, भायखळा स्थानकावरील पूल, ग्रँटरोड स्थानकावरील पूल, केनेडी पूल, डायना पूल आणि फ्रेंच पूल, मरीन लाइन्स येथील प्रिन्सेस स्ट्रीटचा पूल, सँडहर्स्ट रोडवरील पूल