सध्या असहिष्णुतेचे वातावरण देशभर वाढत असून बंदुका आणि तलवारीच्या जोरावर उजव्या शक्ती विवेकाचा आवाज दाबू पाहत आहेत. लोकशाहीचा पाया खिळखिळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षण क्षेत्रावर आक्रमण करू पाहत आहेत. आपली शिक्षक म्हणून ओळख संपविण्याचा प्रयत्न या शक्ती करीत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असली तरी निराश न होता या विरोधात सर्व लेखक, शिक्षक यांनी संवेदनशील सामान्य माणसांना बरोबर घेऊन लढले पाहिजे. आपण एकजुटीने लढलो तर बंदुका आणि तलवारींचा पराभव नक्कीच होईल, असा आशावाद ‘सहाव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलना’चे अध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर यांनी व्यक्त केला.

रत्नागिरी येथील मालगुंड येथे हे संमेलन रंगले होते. राज्याच्या विविध जिल्ह्य़ातून साहित्यप्रेमी शिक्षक या संमेलनात सहभागी झाले होते. प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.

यावेळी कवयित्री नीरजा, नाटककार शफाअत खान, कवी वीरा राठोड, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, शिक्षक आमदार कपिल पाटील, कवी अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

लेखणी आणि खडू हे शस्त्र हाती घेऊन बिघडलेल्या काळाच्या माथ्यावर विवेकाची मुळाक्षरे कोरत राहू. विद्यार्थ्यांकडून नवे विवेकवादी नागरिक घडवू असे आवाहन आपल्या शिक्षक सहकाऱ्यांना बांदेकर यांनी यावेळी केले. उषा तांबे यांनी आजच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून उद्याचं नवं मराठी साहित्य येईल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षकांचा नवी पिढी घडविण्यात थेट संबंध असतो. त्यामुळे समाज शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून मोठी अपेक्षा व्यक्त करतो, असे तांबे यांनी सांगितले.

साहित्य, कला, क्रीडा शिक्षणाची हेळसांड झाली तर नवा चांगला समाज निर्माण होण्यात खीळ बसेल. विद्यार्थ्यांमधून जागरूक नागरिक तयार होण्याची प्रक्रियात संपुष्टात येईल, असा सूर यावेळी ‘साहित्य, कला, क्रीडा शिक्षण शाळेतून हद्दपार?’ या विषयावरील आयोजित परिसंवादात व्यक्त झाला. यात शफाअत खान, गोविंद काजरेकर, किरण लोहार, अभिजित हेगशेटय़े, उदयराज कळंबे सहभागी झाले होते. यावेळी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेल्या कवी संमेलनात अजय कांडर, एकनाथ पाटील, वीरा राठोड, अनुजा जोशी, वीरधवल परब, संजय शिंदे, संजय गवांदे यांनी सहभाग घेतला.