आयआयटी, पालिका, रेल्वेची १२ संयुक्त पथके; समन्वयासाठी दरमहा बैठक

मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले उड्डाणपुलावरील पदपथाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे आणि पालिकेने रेल्वेमार्गावरील ४४५ पुलांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआयटीतील तज्ज्ञ, रेल्वे आणि पालिका अभियंत्यांचा समावेश असलेली १२ संयुक्त पथके शुक्रवारपासून या पुलांचे संरचनात्मक परीक्षण करणार आहेत.

गोखले उड्डाणपुलावरील पदपथाचा काही भाग रेल्वेमार्गावर कोसळला आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली. या दुर्घटनेमुळे रेल्वे आणि पालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. या पाश्र्वभूमीवर पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक गुरुवारी पालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, पालिका उपायुक्त रमेश पवार, पालिकेच्या अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पाचे संचालक विनोद चिठोरे, पूल खात्याचे प्रमुख अभियंता शीतलाप्रसाद कोरी आदी उपस्थित होते.

मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून तब्बल ४४५ पूल जातात. त्यामध्ये उड्डाणपूल, पादचारी पूल आणि स्कायवॉकचा समावेश आहे. पादचारी आणि रेल्वेवाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्वच पुलांची संरचनात्मक तपासणी करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. पुलांची संरचनात्मक तपासणी करण्यासाठी १२ पथके तयार करण्यात आली असून या पथकांमध्ये मुंबईतील आयआयटीमधील तज्ज्ञ, मध्य आणि पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अभियंता आणि पालिकेतील तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही पथके शुक्रवारपासून आपापल्या कार्यक्षेत्रातील पुलांची संरचनात्मक तपासणी करणार आहेत. मुंबईमध्ये लोकमान्य टिळक पूल, एल्फिन्स्टन पूल आणि अन्य काही पूल ब्रिटिशकालीन आहेत. या सर्व पुलांच्या संरचनात्मक तपासणीला प्राधान्य देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

भविष्यामध्ये पालिका, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्यात समन्वय साधण्यासाठी दर महिन्याला नियमितपणे बैठक घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या बैठकीला पालिकेचे वरिष्ठ अभियंता, मध्य व पश्चिम रेल्वेमधील वरिष्ठ अभियंता उपस्थित राहणार आहेत. रेल्वेच्या हद्दीमधील स्वच्छता, नालेसफाई आदी कामे करण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये उभय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येणार आहे.