राज्यात पसरलेल्या गारव्याने आता मुंबईतही प्रवेश केला आहे. गुरुवारी सकाळी सांताक्रूझ येथील तापमापकातील पारा १७.६ अंश सेल्सिअसवर घसरला. पुढील दोन दिवसही पारा चढण्याची शक्यता नसली तरी ही थंडी नव्हे, असे वेधशाळा अधिकारी सांगत आहेत.
गेल्या आठवडय़ात तापमान २० अंश से. पेक्षा कमी झाले. बुधवारी सांताक्रूझ येथे १९.६ अंश से. तापमान नोंदले गेले आणि त्यानंतर गुरुवारी ते आणखी दोन अंशांनी घसरले.
उत्तर भारतात थंडीची लाट सुरू आहे. तेच गार वारे शहरापर्यंत पोहोचले आहेत. पुढील दोन दिवसही तापमानात घट कायम राहील. मात्र त्यानंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही. के. राजीव म्हणाले. मुंबईत डिसेंबर अखेरीस थंडीला सुरुवात होते. त्यामुळे तोपर्यंत तापमानात चढउतार होतील, असेही त्यांनी सांगितले.