सात कोटी ३६ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याने कारवाई

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेचा तब्बल सात कोटी ३६ लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकविणाऱ्या गिरगाव चौपाटीवरील ठक्कर्स कॅटर्सचे उपाहारगृह आणि छोटेखानी कार्यालयाला पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने टाळे ठोकले. पालिकेने थकबाकीची रक्कम भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.

देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सुरू होताच पालिकेचा जकात कर बंद करण्यात आला. जकात कर बंद झाल्यामुळे पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र करोनाकाळामध्ये मालमत्ता कराची वसुली होऊ शकलेली नाही. मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात मालमत्ता करातील सर्वसाधारण कर माफ करण्यात आला, परंतु उर्वरित कर वसूल करण्याबाबत संभ्रम होता. त्यामुळे मालमत्ता कराच्या थकबाकीचा आकडा वाढत गेला. आजतागायत पालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी १५ हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. करोनाकाळात वाढलेला खर्च आणि उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन मालमत्ता कराच्या थकबाकीची रक्कम वसूल करण्यावर करनिर्धारण आणि संकलन विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्र संकुलातील काही जागा उपाहारगृहासाठी आरक्षित आहे. त्यामुळे पालिकेने ही जागा ठक्कर्स कॅटर्सला उपाहारगृहासाठी भाडेपट्टय़ाने दिली आहे.

ठक्कर्स कॅटर्सने २०१३ पासून पालिकेचा मालमत्ता कर भरलेला नाही. मालमत्ता करापोटी २०१२ ते २०२० पर्यंतच्या कालावधीत तब्बल सात कोटी ३६ लाख ४६ हजार ९२३ रुपये थकले असून या रकमेच्या वसुलीसाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. स्मरणपत्र, नोटीस बजावल्यानंतरही ही रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आलेली नाही. अखेर करनिर्धारण आणि संकलन विभागाने बुधवारी ठक्कर्स कॅटर्सचे उपाहारगृह आणि छोटेखानी कार्यालयाला टाळे ठोकले.