ठाण्यातील महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेणा-या विरोधकांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. काम करण्यासाठी जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवला असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे.

ठाण्यात सोमवारी महापौर आणि उप महापौरपदाची निवडणूक पार पडली. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. ठाण्यातील १३१ जागांपैकी शिवसेनेला ६७ जागांवर विजय मिळाला होता. शिवसेनेला बहुमत असले तरी अन्य पक्षांनीही अर्ज दाखल केल्याने महापौर आणि उप महापौरपदासाठी निवडणूक होणार हे स्पष्ट होते. मात्र सोमवारी सकाळी भाजप, राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महापौरपदावर शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.

महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यात शिवसेनेने शक्तिप्रदर्शनही केले. सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच महापालिका मुख्यालयात आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक येतात आणि जातात. प्रचारात धूरळाही उडवून झाला आहे. आता पुढील पाच वर्ष आपल्याला एकत्र काम करायचे आहे. महापौर आणि उप महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेणा-या विरोधकांचे आभार अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली.

शिवसेना आणि ठाण्याचे भावनिक नाते आहे. ठाणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे ते म्हणालेत. ठाणे महापालिकेच्या आयुक्तांचेही ठाकरेंनी आभार मानले. धडाडीचे आयुक्त मिळाल्यावर कामात जोर येतो. आम्ही दिलेली वचनं आयुक्तांनी पूर्ण केली आणि भविष्यातही ते वचन पूर्ण करतील असे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेविषयीच्या प्रश्नांवर भाष्य करणे टाळले. शिवसेनेने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली आहे असे सांगत मुंबईतच यावर अधिक भाष्य करणार असे त्यांनी सांगितले.